अंगावर काटा आणणारी घटना! बिबट्याने डोंगराच्या दिशेने फरपटत नेलेल्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; तालुक्यात खळबळ

खेडभैरव (जि.नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना असून या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याला सहा ते सात दिवसात वनविभागाने जेरबंद करावे अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने साऱ्यांचाच थरकाप उडाला आहे.

अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने साऱ्यांचाच थरकाप; काय घडले वाचा...

पिंपळगाव मोर (ता. इगतपुरी) येथील जवळच असणाऱ्या भैरवनाथ मंदिराच्या परिसरातील वस्तीवरील गुरुवारी (ता.19) संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास कविता आनंदा मधे (वय.6) शौचालयास गेली असता तिच्यावर बिबट्याने झडप घालून तिला डोंगराच्या दिशेने फरपटत नेले. यात तिचा मृत्यू झाला. ही माहिती वनविभागाला कळवली असता वनविभागाने मुलीचा रात्रीच शोध घेण्यास सुरुवात केली. (शुक्रवारी ता.20) सकाळी 9 वाजता मुलीचे अवयव व शरीर मृत अवस्थेत सापडले व पुढे घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा > महाराणीच्या दुर्लक्षित समाधीचा शोध; अंगठीतील हिरा गिळून केला होता देहत्याग

वारंवार दहशत; बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी 

वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले असून पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करत आहेत.दरम्यान आमदार हिरामण खोसकर यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. नागरिकांनी याबाबत बिबट्याची वारंवार दहशत असल्याचे सांगताच आमदारांनी जिल्हाधिकारी व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून प्रशिक्षित फायर गनधारींना पाचारण करण्याच्या सूचना दिल्या. व मृत बालकाच्या वारसांना तातडीने मदत देण्यात यावी असे सांगितले.यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, संपत काळे, वनपरिमंडळ अधिकारी पोपट डांगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा > संतापजनक! २० वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्यावर अत्याचार; प्राचार्य विरोधात गुन्हा दाखल

तालुक्यातील चौथी घटना
बिबट्याच्या हल्याची ही तालुक्यातील चौथी घटना असून परिसरात घबराट निर्माण झाली आहे. बिबट्याला सहा ते सात दिवसात वनविभागाने जेरबंद करावे अन्यथा वस्तीवरील ग्रामस्थ हे वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा अखिल आदिवासी ग्रुप कार्याध्यक्ष संतोष रौंदळे, अध्यक्ष हिरामण कवटे व ग्रामस्थांनी दिला.