अंतर्गत गुण सादर करण्याची ‘मुक्त’तर्फे २० मेपर्यंत मुदत; विद्यापीठाने जारी केल्‍या सूचना 

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ अधीनस्थ संलग्‍न शिक्षणक्रमांच्‍या सर्व केंद्रप्रमुख आणि केंद्र संयोजकांकरिता परिपत्रक जारी केले असून, बी. ए., बी. कॉम. हे शिक्षणक्रम वगळून सत्र पद्धतीच्‍या शिक्षणक्रमाच्‍या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्‍यमापनाचे गुण ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाला सादर करावे लागणार आहे. गुण सादर करण्यास २० मेपर्यंत मुदत असणार आहे. 

पत्रकात म्‍हटले आहे, की संबंधित विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊन अंतर्गत मूल्‍यांकन करून घेतलेले आहे. त्‍यानुसार त्‍यांचे विषयनिहाय गुण उपलब्‍ध लिंकद्वारे अभ्यास केंद्रांच्‍या स्‍तरावर भरायचे आहे. त्‍याची प्रत काढून घेत, पडताळणी करून मगच अपलोड करावे. ही लिंक १९ एप्रिलपासून उपलब्‍ध होणार असून, २० मेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ऑफलाइन पद्धतीने गुण स्‍वीकारले जाणार नसल्‍याचेही पत्रकात स्‍पष्ट केले आहे. दरम्यान, प्रथम, तृतीय सेमिस्‍टरच्‍या शिक्षणक्रमांचे प्रात्यक्षिक, मौखिक, प्रकल्‍प व चर्चासत्र (डिसेंबर २०२० इव्‍हेंट) या सर्व परीक्षा १९ एप्रिल ते १५ मेदरम्‍यान ऑनलाइन पद्धतीने होतील. गुगल मीट, झूम आदी ऑनलाइन व्‍यासपीठाच्‍या माध्यमातून परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने सुचविले आहे. तसेच, वेळापत्रकाबाबात परीक्षार्थींना पूर्वकल्‍पना देण्यास सांगितले आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कुठलेही अंतर्गत मूल्‍यमापनाचे गुणदान करता येणार नसल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ