अंतिम मंजुरीनंतर नाशिक मेट्रोचे लवकरच कामकाज; प्रकल्प पूर्णत्वासाठी आणखी एक टप्पा   

अंतिम मंजुरीनंतर मेट्रोचे लवकरच कामकाज 

प्रकल्प पूर्णत्वासाठी आणखी एक टप्पा 

 
नाशिक : शहरातील नावीन्यपूर्ण आणि प्रतिष्ठेच्या मेट्रो निओ प्रकल्पाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड (PIB)ने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता प्रकल्पाच्या अंतिम मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेनंतर लवकरच प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. मेट्रोच्या सूत्रांनी ही माहिती दिली. 

केंद्रीय शहरी विकास कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा, महामेट्रोचे महासंचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आदींनी नाशिकच्या नियो प्रकल्पाला लवकरच केंद्र सरकारची अंतिम मान्यता मिळणार असून, त्यांनी महामेट्रोच्या अधिकारी वर्गाला कामाची रूपरेषा तयार करून काम सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्या त्या विभागांना देण्यात दिल्या आहेत. केंद्र सरकार, राज्य शासन, सिडको आणि नाशिक महापालिकेचा संयुक्त प्रकल्प असलेल्या नाशिक शहरातील ३३ किलोमीटरच्या मेट्रो निओ मार्गासाठीच्या प्रकल्पासाठी अर्थ समितीच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पासाठी केवळ अंतिम मान्यता मिळणे बाकी आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

प्रस्तावित प्रकल्प 

गंगापूर ते मुंबई नाका आणि गंगापूर ते नाशिक रोड रेल्वेस्थानक अशा ३३ किलोमीटरच्या दोन मार्गिकांत ३० स्थानके असणार आहेत. हा दोन हजार ९२ कोटींचा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होईल. नाशिक मेट्रो निओ प्रकल्प रबर टायर बस वापरून जलद प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. रबर टायर बस ओव्हरहेड इलेक्ट्रिकद्वारा चालविण्यात येतील. मेट्रो निओ हा इतर शहरात असणाऱ्या मेट्रोइतकाच आरामदायी, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि जलद तसेच मेट्रो निओचे कोच हे इतर मेट्रोच्या कोचसारखेच वातानुकूलित असणार आहेत. भारतात अशा प्रकारचा प्रकल्प प्रथमच साकारत असून, त्यामुळे नाशिक शहराचे नाव जगभरात प्रसिद्ध होणार आहे.  

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ