अंबित धरणाची गळती दुर्लक्षित! प्रकल्पाच्या भिंतीचा काही भाग खचला; नागरिक भयभीत 

नाशिक : नाशिक-नगर सीमावर्ती भागातील अकोले तालुक्यातील अंबित धरणाला काही महिन्यांपासून गळती लागली आहे. धरणाच्या भिंतीच्या पायाचा काही भाग खचल्याने धरणाच्या पोटाशी वाड्या-पाड्यावर राहणाऱ्या नागरिकांची झोप उडाली आहे. 

स्थानिक आमदारांनी काही दिवसांपूवी हा विषय पाटबंधारे विभागाच्या लक्षात आणून दिला असला तरी त्यावर काही उपाय निघालेला नाही. नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांसह अकोले तालुक्यातील धरणातून गोदावरी नदीपात्राद्वारे मराठवाड्याला पाणीपुरवठा होतो. मात्र या भागातील धरणाची सुरक्षा व उपाययोजना हा कायमच चिंतेचा विषय रहिला आहे. मराठवाड्यासह १३ जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारे दारणा असो की गंगापूर यांसह बहुतांश धरणे ब्रिटिशकालीन आहेत. पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाला म्हणजे दरवेळी धरणाची डागडुजी आणि त्यात साचलेला गाळ हे विषय ऐरणीवर येतात. 

अंबित धरणाला गळती 

अकोले तालुक्यातील मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात अंबित धरण बांधले आहे. १९३ घनफूट क्षमतेच्या या धरणाच्या पायाचा काही भाग खचला असून, त्यातून काही महिन्यांपासून अविरत गळती सुरू आहे. मध्यंतरी सहा महिन्यांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. त्या वेळी धरणाच्या प्रवाह मार्गावरील वाड्या-पाड्यांवरील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक आमदार डॉ. किरण लहामटे यांनी हा विषय जलसिंचन विभागाच्या लक्षात आणून दिला. मात्र मुख्य शहरापासून दूर असलेल्या या भागातील गळतीवर अद्याप मार्ग निघालेला नाही. 

पाच गावांमध्ये भीती 

अंबित धरणाचा लघुप्रकल्प पावसाळ्यात पूर्ण भरतो. त्यातून मुळा नदीत पाणी सोडले जाते. धरणाच्या लाभक्षेत्रात अंबित, शिसवद, खडकी, पैठण, पाडाळणे, धामणगावपर्यंतचा परिसर येतो. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

- मुळा नदीच्या पाणलोटातला लघुप्रकल्प 
- १९३ घनफूट क्षमता 
- दर वर्षी १०० टक्के जलसाठा 
- धरण क्षेत्रातील पाच गावांत कायम भीती 

नाशिक-नगर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात भेटी देणाऱ्या पर्यटक गिर्यारोहकांना गळक्या धरणाचा धोका लक्षात येतो. स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते त्याविषयी तक्रारी करतात, तरी प्रशासनाच्या ही बाब कशी लक्षात येत नाही, हा प्रश्न आहे. 
- शेखर गायकवाड (आपलं पर्यावरण, नाशिक) 

 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ