अकरावी प्रवेशाची प्रतीक्षा संपली! विद्यार्थ्यांना एसईबीसीऐवजी अन्‍य प्रवर्गातून प्रवेश

नाशिक : दोन महिन्‍यांहून अधिक कालावधीपासून रखडलेल्‍या अकरावीच्‍या प्रवेशप्रक्रियेला अखेर मुहूर्त लाभला आहे. एसईबीसी प्रवर्गातून यापूर्वी प्रवेशासाठी अर्ज सादर केलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्‍ती करत अन्‍य प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज करावा लागणार आहे. ५ डिसेंबरला दुसरी गुणवत्तायादी जाहीर होणार आहे. तत्‍पूर्वी अर्जात दुरुस्‍ती व अन्‍य बाबींच्‍या पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांना मुदत उपलब्‍ध असेल. 

एसईबीसी आरक्षणाबाबतचा मुद्दा न्‍यायप्रविष्ट असताना सर्वच प्रवेशप्रक्रिया रखडली होती. त्‍यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रिया आरक्षणाशिवाय पार पाडण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. त्‍यानुसार यापूर्वी अकरावीसाठी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज सादर केलेल्‍या विद्यार्थ्यांना अन्‍य प्रवर्गातून प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी त्‍यात दुरुस्‍ती करावी लागेल. यासंदर्भात जारी केलेल्‍या सुधारित वेळापत्रकानुसार गुरुवारी (ता.२६) दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी रिक्‍त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

दुसरी गुणवत्तायादी ५ डिसेंबरला

गुरुवारी (ता.२६) सायंकाळी पाचपासून १ डिसेंबरच्‍या रात्री अकरा वाजून ५५ मिनिटांपर्यंत एसईबीसी आरक्षणासाठी अर्ज भरलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्‍ती करता येईल. तसेच अन्‍य सर्व विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्‍तीची संधी व अर्जाच्या भाग दोनमध्ये सुधारणा करता येतील. अकरावीला प्रवेश घेऊ इच्‍छिणाऱ्या; परंतु अद्याप अर्ज न केलेल्‍या विद्यार्थ्यांनाही नव्‍याने नोंदणी व अर्जाचा भाग एक व दोन भरण्याची संधी मिळेल. यापूर्वी ज्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेश फेटाळले किंवा रद्द ठरविलेले आहेत किंवा प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या फेरीत सहभागी होता येणार आहे. व्‍यवस्‍थापन कोटा किंवा अल्‍यासंख्याक कोट्याच्‍या जागांसाठी संबंधित महाविद्यालयांमध्ये अर्ज करावे लागतील. यानंतरच्‍या प्रक्रियेत ३ व ४ डिसेंबरचा कालावधी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने राखीव ठेवला आहे. दुसरी गुणवत्तायादी ५ डिसेंबरला सकाळी अकराला जाहीर होणार आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

९ डिसेंबरपर्यंत मुदत 

दुसरी गुणवत्तायादी व कट-ऑफ लिस्‍ट जाहीर केल्‍यानंतर विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्‍चितीसाठी ५ ते ९ डिसेंबरदरम्‍यान मुदत असेल. यानंतरच्‍या टप्प्यात १० डिसेंबरला रिक्‍त जागांचा तपशील जाहीर केला जाईल. यापूर्वी प्रवेशनिश्‍चित केलेल्‍या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. पुढील फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार असल्‍याचे शिक्षण विभागाने स्‍पष्ट केले आहे.