अकरावी प्रवेशाचे पर्याय बदलणे, अर्ज दुरुस्तीची उद्यापर्यंत मुदत 

नाशिक : बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्‍या अकरावीच्‍या प्रवेशप्रक्रियेला गती मिळाली असून, दुसऱ्या फेरीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसऱ्या प्रवेश फेरीत सहभागी होऊ इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्‍याने नोंदणी, अर्जात बदल करण्यासाठी शनिवार (ता. १२)पर्यंत मुदत असेल. मंगळवारी (ता. १५) तिसऱ्या फेरीसाठी गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

तिसऱ्या फेरीसाठीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने नुकतेच जारी केले आहे. त्‍यानुसार आतापर्यंत नोंदणी न केलेल्‍या विद्यार्थ्यांना नोंदणी करून, अर्जाचा भाग एक व भाग दोन भरता येईल. तसेच यापूर्वी नोंदणी केलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्जाच्‍या भाग एकमध्ये दुरुस्‍ती किंवा बदल आणि महाविद्यालय पसंतीक्रम बदलाची संधी उपलब्‍ध असेल. त्‍यासाठी शनिवार (ता. १२)पर्यंत मुदत असेल. यानंतर रविवार (ता. १३) आणि सोमवार (ता. १४) असे दोन दिवस तांत्रिक प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षण विभागाने राखीव ठेवले आहेत. मंगळवारी (ता. १५) सकाळी अकराला तिसरी गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्‍चितीसाठी शुक्रवार (ता. १८)पर्यंत मुदत दिली जाणार आहे. यापुढील टप्प्यात होणाऱ्या विशेष फेरीसाठी रिक्‍त जागांचा तपशील २० डिसेंबरला जारी केला जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

कट ऑफकडे लक्ष 
यापूर्वी जारी केलेल्‍या दोन गुणवत्तायाद्यांत विज्ञान शाखेचा नामांकित महाविद्यालयात प्रवेशाचा कट ऑफ ९० टक्क्‍यांहून अधिक राहिला. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या गुणवत्तायादीत नव्वदपेक्षा अधिक राहतो का, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून आहे. विज्ञानाप्रमाणे वाणिज्‍य शाखेच्‍या प्रवेशासाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये चुरस बघायला मिळते आहे. 

हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न