अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरणे, दुरुस्‍तीसाठी आज अखेरची संधी

नाशिक : अकरावी प्रवेश प्रक्रियेला पुन्‍हा सुरवात झाल्‍यानंतर सध्या अर्ज भरणे किंवा अर्जात दुरुस्‍ती करण्याची मुदत विद्यार्थ्यांना दिली आहे. त्‍यानुसार इच्‍छुक विद्यार्थ्यांना मंगळवार (ता. १)पर्यंत अर्जात दुरुस्‍ती करता येणार आहे. येत्‍या शनिवारी (ता. ५) दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

शनिवारी दुसरी निवडयादी होणार जाहीर

यापूर्वी ज्यांनी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेले आहेत, त्‍यांना सद्यःस्‍थितीत खुल्‍या प्रवर्गातून किंवा ईडब्‍ल्‍यूएस प्रवर्गातून आपला अर्ज सादर करता येईल. खुल्‍या प्रवर्गासाठी कुठल्‍याही प्रकारच्‍या कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्‍यकता नसेल. तथापि, ईडब्‍ल्‍यूएस प्रवर्गातून अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. त्‍यासाठी त्‍यांना तीन महिन्‍यांचा कालावधी दिला जाणार आहे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्‍ती करणे आवश्‍यक असेल. तसेच, अन्‍य विद्यार्थ्यांनाही दुरुस्‍तीची संधी उपलब्‍ध असणार आहे. यापूर्वी प्रवेश फेटाळले किंवा रद्द ठरविले असलेल्‍या विद्यार्थ्यांना किंवा प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत सहभागी होता येणार आहे.
त्‍यासाठी मंगळवारी अखेरची मुदत आहे.

१० डिसेंबरला रिक्‍त जागांचा तपशील जाहीर

पुढील प्रक्रियेत ३ व ४ डिसेंबरचा कालावधी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने राखीव ठेवला आहे. शनिवारी दुसरी गुणवत्तायादी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी ५ ते ९ डिसेंबरदरम्‍यान मुदत असेल. यानंतरच्‍या टप्प्यात १० डिसेंबरला रिक्‍त जागांचा तपशील जाहीर होईल. दरम्‍यान, व्‍यवस्‍थापन कोटा किंवा अल्‍यासंख्याक कोट्याच्‍या जागांसाठी संबंधित महाविद्यालयांमध्ये अर्ज करावे लागतील. यापूर्वी झालेल्‍या पहिल्‍या फेरीत प्रवेशनिश्‍चित केलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्‍या पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असेही शिक्षण विभागाने स्‍पष्ट केले आहे.