अकरावी प्रवेश : विशेष फेरीतील गुणवत्ता यादी गुरूवारी; सहभागासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी बंधनकारक 

नाशिक : महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेशासाठीची प्रक्रिया सध्या सुरू असून, तीन फेऱ्या पार पडल्‍या आहेत. या तिन्‍ही फेऱ्यांत विज्ञान शाखेत प्रवेशासाठी चुरस बघायला मिळाली. यातून विद्यार्थी व पालकांचे लक्ष विशेष फेरीकडे लागून आहे. रविवार (ता.२०) पासून विशेष फेरीची प्रक्रिया सुरू झाली असून, येत्‍या गुरूवारी (ता.२४) या फेरीसाठीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

विशेष फेरीकरीता रिक्‍त जागांचा तपशील रविवारी (ता. २०) जारी करण्यात आला आहे. या जागांवर प्रवेशासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू झालेली आहे. विशेष फेरीसाठी विद्यार्थ्यांचा ऑप्शन फॉर्म (अर्जाचा भाग दोन) हा अनलॉक केला गेलेला आहे. त्‍यामूळे सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरून आपला अर्जाचा भाग दोन लॉक करणे बंधनकारक असणार आहे. या आधीच्‍या फेऱ्यांसाठी दिला गेलेला पसंती क्रमांक ग्राह्य धरला जाणार नसल्‍याचेही शिक्षण विभागातर्फे कळविले आहे. तसेच यापूर्वीच इतरत्र प्रवेश निश्‍चित झालेला असल्‍यास अशा विद्यार्थ्यांनी प्रक्रियेत सहभागी होण्याची आवश्‍यकता नसल्‍याचेही सांगितले आहे. दरम्‍यान यापुढील वेळापत्रकानुसार मंगळवारी (ता. २२) पर्यंत सायंकाळी पाचपर्यंत अर्जाचा भाग एक दुरूस्‍ती तसेच अर्जाच्‍या भाग दोनमध्ये प्राधान्‍यक्रमात बदल करण्यासाठी मुदत असेल. यापूर्वी प्रक्रियेत सहभागी न झालेल्‍या विद्यार्थ्यांना नव्‍याने नोंदणी करण्याचीदेखील संधी या मुदतीत असेल. गुरूवारी (ता.२४) सकाळी अकराला विशेष फेरीसाठीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीतील विद्यार्थ्यांना शनिवार (ता.२६) पर्यंत प्रवेश निश्‍चितीसाठी मुदत असणार आहे. 

हेही वाचा >> मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट ​

विद्यार्थ्यांचा कन्‍सेंट महत्त्वाचा 

शासनाद्वारे मिळालेल्या मार्गदर्शक सूचनेद्वारे ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीला प्रवेश निश्चित झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांना विशेष फेरीस पात्र ठरण्यासाठी आपल्या लॉगिन मधून कन्सेंट (होकार) देणे बंधनकारक असणार आहे. जे विद्यार्थी कन्सेंट देणार नाही, त्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही, असे शिक्षण विभागाने स्‍पष्ट केले आहे. कन्सेंट न देणारे किंवा किंवा पसंतीक्रम भरून आपला फॉर्म लॉक न करणार्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीसाठी पात्र धरले जाणार नसल्‍याचेही नमूद केले आहे. 

हेही वाचा >> चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर ​