अकरा महिन्यांत अवघी १०३ कोटींची वसूली! महापालिकेच्या दीड हजार थकबाकीदारांना नोटिसा 

नाशिक : आर्थिक वर्षाचा अखेरचा मार्च महिना महापालिकेच्या महसुल वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. परंतु, कोरोनामुळे यंदाचे वर्ष अपवाद ठरताना दिसत आहे. या वर्षात साडेअकरा महिन्यांत अवघी १०३ कोटी रुपये घरपट्टी वसुली झाली असून, थकबाकी ३९५ कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. उर्वरित वीस दिवसांमध्ये वसुली करण्यासाठी विविध कर विभागाने एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या दीड हजार थकबाकीदारांना नोटिसा पाठवल्या असून, थकबाकी अदा न केल्यास सात-बारा उताऱ्यावर मिळकतीचा बोजा चढविला जाणार आहे. 

कोरोनामुळे महापालिकेच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. शासनाकडून ‘जीएसटी’च्या रूपाने मिळणारे उत्पन्न नियमित मिळत असल्याने महसुली खर्चाचा प्रश्‍न मिटला असला तरी भांडवली कामांवर त्याचा परिणाम झाला आहे. जीएसटीपाठोपाठ घरपट्टीतून उत्पन्न मिळते. परंतु, यंदा या उत्पन्नात घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे दीडशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७० कोटी रुपये वसूल झाले आहेत. गेल्या वर्षी १० मार्चपर्यंत १३६ कोटी रुपये वसूल झाले होते. गेल्या वर्षाचा विचार करता ३३ कोटी रुपयांची वसुलीत तूट दिसून येत आहे. महापालिकेने अभय योजना राबविली होती, परंतु त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थकबाकीदार मिळकत जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. महापालिकेने एक हजार ५२० मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, ८० मिळकतधारकांना जप्ती वॉरंट बजावले आहे. थकबाकी अदा न केल्यास मिळकत जप्तीची कारवाई करून त्यानंतरही थकबाकी अदा केली नाही, तर सातबारा उताऱ्यावर बोजा चढविला जाणार आहे, अशी माहिती कर उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

घरपट्टी वसुलीची स्थिती 
- शहरात ४.५७ लाख मिळकतधारक 
- थकबाकीसह घरपट्टी वसुलीचे ४९६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट 
- १० मार्चपर्यंत १०३ कोटींची वसुली 
- सध्याची थकबाकी ३९५ कोटी रुपये 
- चालू वर्षात थकबाकी वसुली ७० कोटी 
- गेल्या वर्षाची ३२ कोटींची थकबाकी वसुली 
- वसुलीचे टक्केवारीचे प्रमाण ४५ टक्के 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO