अकाउंट हॅक करून फ्रेंड लिस्टमधील व्यक्तींना पैशांची मागणी; फेसबुकवर वाढते धक्कादायक प्रकार

कळवण (जि.नाशिक) : फेसबुकवर युझर्सचे अकाउंट हॅक करून अथवा फेक अकाउंट तयार करून युझर्सच्याच फ्रेंड लिस्टमधील व्यक्तींना मेसेज करून पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. त्यामुळे फेसबुक वापरताना युझर्सना अधिक सतर्क राहून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. 

फेसबुकवर वाढते प्रकार
फेसबुकचे जगभरात कोट्यवधी युझर्स आहेत. सोशल मीडियातील महत्त्वाचे ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकवर तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांची अकाउंट आहेत. हे ॲप वापरताना बऱ्याचदा युझर्सकडून सावधगिरी बाळगली जात नाही. त्याचाच फायदा घेत काही हॅकर्स अकाउंट हॅक करतात. अथवा युझर्सचे फोटो वापरून बनावट अकाउंट तयार करतात. फ्रेंड लिस्टमधील लोकांना मेसेज करून आपल्याला आर्थिक अडचण असल्याचे सांगून पैशांची मागणी करतात.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

दक्षता घेण्याचे आवाहन 

अनेक जण आपला मित्र पैसे मागत असल्याचे बघून पैसे देतात. मात्र कालांतराने फसवले गेल्याचे सत्य समोर येते. काही महिन्यांत अशा घटना समोर येत असून, युझर्सने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट, मेसेजबाबत पडताळणी करून सत्यता जाणून घेणे गरजेचे आहे. आधी माहितीची खातरजमा न केल्यास आर्थिक नुकसान होऊन अशा प्रकारात फसवले जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

ग्रामीण भागही लक्ष्य 
हॅकर्सकडून शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना अशाप्रकारे गंडवले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली जाते. अनेक जण अशा प्रकारांना बळी पडून फसवले जात असल्याने युझर्सने योग्य खबरदारी घ्यायला हवी. 

काय करता येईल ः 
- अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारू नये 
- पैशांची मागणी होत असल्यास खात्री केल्याशिवाय निर्णय घेऊ नये 
- बनावट अकाउंट लक्षात आल्यास संबंधिताला याबाबत कल्पना द्यावी- फ्रेंड लिस्ट वेळोवेळी तपासावी 

नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी. दिवसेंदिवस सायबर गुन्हे घडत असल्याने वापरकर्त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. 
- प्रमोद वाघ, पोलिस निरीक्षक, कळवण