अखेर निसर्गापुढे शेतकरी झाला हतबल; द्राक्षबागेतील प्रकार पाहून पत्नीला धक्का

लखमापूर (जि.नाशिक) : सायंकाळी शेतकऱ्याची पत्नी कोथिंबीर विकण्यासाठी गावात गेलेली असताना, शेतकरी द्राक्षबागेत गेला. काही वेळातच पत्नी घरी आल्यावर त्यांना त्यांचा मोबाईल व डायरी घरात दिसली. त्यामुळे त्या आवाज देत देत समोरच असलेल्या बागेत गेल्या. त्यावेळी तिथला घडलेला प्रकार पाहून पत्नीलाही धक्का बसला.  अत्यंत दुर्दैवी घटना खेडगाव (ता. दिंडोरी) येथे घडली आहे.

उसनवार पैसे कसे परत करायचे, याचीही चिंता
ठुबे यांच्या दीड एकर क्षेत्रातील आणखी एक एकर द्राक्षबाग खुडणे बाकी होते. पहिल्या एक बिघे क्षेत्रातील द्राक्षांची काढणी झाली होती. परंतु बाग कमी आलेले असल्याने खूपच कमी माल निघाला. पुढचा बाग जरा बरा असल्याने त्यात पैसे होतील, या आशेवर त्यांनी नातेवाइकांकडून उसनवारी करून बँकेची थकबाकी भरून, कर्ज पुन्हा सुरळीत करून घेतले होते. दर वर्षी बँकेत वेळेवर पैसे भरून ते कर्ज खाते नियमित ठेवत असत. मात्र, द्राक्षबागेचा खुडा बाकी असल्याने वीजबिलाची थकबाकी भरण्याची त्यांची परिस्थिती नव्हती. त्यामुळे तीन ते चार दिवसांपासून त्यांच्या शिवारातील डीपी बंद केल्याने ते चिंतेत होते. द्राक्षांनाही बाजारभाव कमी असल्याने उसनवार पैसे कसे परत करायचे, याचीही चिंता त्यांना सतावत होती. त्यातच, शनिवारी (ता. २०) झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

द्राक्षबागेतील प्रकार पाहून पत्नीला धक्का

सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची पत्नी कोथिंबीर विकण्यासाठी गावात गेलेली असताना, घरातून विषारी औषधाची बाटली घेऊन द्राक्षबागेत गेले व तेथे औषध घेतले. काही वेळातच पत्नी घरी आल्यावर त्यांना त्यांचा मोबाईल व डायरी घरात दिसली. त्यामुळे त्या आवाज देत देत समोरच असलेल्या बागेत गेल्या. तेव्हा त्यांना तेथे पती बेशुद्धावस्थेत दिसले. शेजारच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ पिंपळगाव येथील खासगी दवाखान्यात नेले. मात्र, तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मागे पत्नी व विवाहित मुलगी आहे. 

 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

द्राक्षांचे भाव का पडले याची चौकशी व्हावी
खेडगाव (ता. दिंडोरी) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळासाहेब ठुबे यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. कर्ज, सततची नापिकी, त्यातच अवकाळीमुळे झालेले नुकसान, वीजबिलाचे संकट आदी कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, या कुटूंबास शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळावी, सरकारने व वीज वितरण कंपनीने सुरू केलेली वीज थकबाकी वसुली मोहीम त्वरित थांबवावी व यंदा उत्पादन कमी असतानाही द्राक्षांचे भाव का पडले याची चौकशी व्हावी, अशी मागणी खेडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.