अखेर बेपत्ता शेतमजूराचा शोध लागला; पण धक्कादायक दृश्याने गावात खळबळ

सोग्रस (जि.नाशिक) : एकवीस वर्षांचा भास्कर हा तरुण आपल्या कुटुंबासह आई-वडील, भाऊ, पत्नी आदींसह एका शेतकऱ्याकडे शेतमजुरी व द्राक्षबागेचे काम करण्यासाठी आला होता. पण त्यानंतर त्याच्याबाबत जे काही घडले ते अत्यंत भयानक होते. त्या धक्कादायक दृश्यानंतर गावात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. चिखलआंबे (ता. चांदवड) येथील  ही घटना आहे.

अखेर बेपत्ता शेतमजूराचा शोध लागला..पण.....

सुरगाणा तालुक्यातील उदाव दारी येथील भास्कर भावल्या वळवी (वय २१) कुटुंबासह आई-वडील, भाऊ, पत्नी आदींसह चिखलआंबे येथील शेतकऱ्याकडे शेतमजुरी व द्राक्षबागेचे काम करण्यासाठी आला होता. २ डिसेंबरपासून संध्याकाळच्या सुमारास तो बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी या संदर्भात वडनेरभैरव पोलिस ठाण्यात बेपत्ताची माहिती दिली होती. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास चिखलआंबे येथील गट क्रमांक ६६ चे शेतमालक गंगाधर शेळके यांच्या विहिरीत भास्करचा मृतदेह तरंगताना आढळला. ग्रामस्थांनी त्वरित वडनेरभैरव पोलिस ठाण्यात माहिती कळविली. तोपर्यंत भास्करचा मृतदेह विहिरीत आढळल्याची माहिती परिसरातील मजुरीसाठी आलेल्या सुरगाणा तालुक्यातील लोकांना समजली. घटनास्थळी अडीचशे ते तीनशे लोकांचा जमाव जमला.

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा

चिखलआंबे येथील घटना; मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा ​

जमावाने माजी आमदार जे. पी. गावित घटनास्थळी येईपर्यंत मृतदेहाला हात लावू देण्यास नकार दिला. ही घटना पोलिसांना कळताच घटनास्थळी वडनेरभैरव, वडाळीभोई, चांदवड आणि मनमाड येथून मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला. तसेच दंगा नियंत्रण पथकही काही वेळातच घटनास्थळी उपस्थित झाले. काही वेळाने जे. पी. गावित तेथे येताच त्यांनी जमावाची समजूत काढून भागवत जाधव (चिखलआंबे), मोहन गांगुर्डे (शिवरे), संपत जाधव (एकरुखे), उत्तम गांगुर्डे (इंदिरानगर), वसंत नागरे (जांबुटके) आदी पोलिसपाटलांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो विच्छेदनासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. मृत भास्करच्या मागे पत्नी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. मृतदेह विच्छेदनासाठी पाठविल्यानंतरही चिखलआंबे परिसरात वातावरण तप्त होते. दंगा नियंत्रण पथक आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. 

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

आत्महत्या की घातपात चर्चेला उधाण

चिखलआंबे (ता. चांदवड) येथील शेतातील विहिरीत सुरगाणा तालुक्यातील तरुणाचा मृतदेह रविवारी (ता. ६) सकाळी सहाच्या सुमारास आढळला असून, हा प्रकार आत्महत्या की घातपात अशी चर्चा होत आहे.