अखेर रणगाडा प्रदर्शनासाठी होणार खुला! बाप-बेट्याच्या लढाईत जागेच्या भूमिपूजनाचा विजय

सिडको (नाशिक) : कायदेशीर बाबी पुढे करून रणगाड्याच्या जागेला विरोध दर्शविणाऱ्या मुलाचा विरोध झुगारात ऐनवेळी दस्तरखुद्द वडिलांनीच हातात कुदळ घेऊन देशाच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या रणगाडा बसविण्यात येणाऱ्या जागेचे स्वतःच्या हस्ते भूमिपूजन केल्याने या जागेच्या वादावर अखेर पडदा टाकण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. बाप-बेट्याच्या लढाईत जागेच्या भूमिपूजनचा झालेला विजय सध्या सिडको परिसरात सर्वत्र चर्चिला जात आहे. 

अनेक वर्षांपासूनच्या वादावर अखेर माती 

प्रभाग २४ मधील शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी पुढाकार घेऊन सिडकोतील लेखानगर चौकात रणगाडा बसवण्याचे काम हाती घेतले होते. परंतु सदर जागा ही सिडकोने नर्सरीसाठी राखीव ठेवल्याची बाब पुढे करून गौळाण्याचे सरपंच अजिंक्य चुंभळे यांनी विरोध केला होता. त्यामुळे सदर जागेवर रणगाडा बसविण्यास विलंब होत होता. त्यानंतर मोठ्या प्रयत्नाने रणगाडा देखील नाशिकमध्ये कसाबसा पोचला. परंतु जागेचा प्रश्न मात्र काही करता सुटत नव्हता. सदर बाब लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिकांनी अजिंक्य चुंभळे यांचे वडील व बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या निदर्शनास आणून दिली. या सर्व घटनाक्रमाची माहिती घेऊन चुंभळे यांनी स्वतःहून पुढाकार घेत व हातात कुदळ घेऊन जागेचे भूमिपूजन केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला या जागेच्या वादावर अखेर माती टाकण्याचे काम झाले. यामुळे आतापर्यंत ‘बाप से बेटा सवाई’ असे म्हटले जात होते. परंतु, या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘बाप बाप होता है’ हेच या निमित्ताने नागरिकांना प्रकर्षाने दिसून आले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लवकरच रणगाडा सर्वांच्या प्रदर्शनासाठी बसविण्यात येणार आहे.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

सिडकोवासीयांमध्ये समाधान

पाकिस्तानच्या युद्धात शत्रूला धूळ चारणारा व सध्या सिडको परिसरात स्टेट बँक चौकातील महामार्गालगत बसविण्यात येणाऱ्या रणगाड्याच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादावर जागेचे भूमिपूजन करून अखेर पडदा टाकण्याचा काहीअंशी यशस्वी प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमामुळे सिडकोवासीयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश