अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

दिंडोरी (जि.नाशिक) : उत्तम विठ्ठल पारधी यांना चार मुली व एक मुलगा असून एक महिन्यापूर्वीच एका मुलीचे गंभीर आजाराने निधन झाले. त्यातील दोन मुलींनाही काळाने घेरले असल्याने पारधी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काय घडले नेमके?

दोन सख्ख्या बहिणींना काळाने घेरले

पद्मा पारधी (वय ११) आणि फशा पारधी (वय ९)दोघी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. मात्र पाय घसरून विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. पद्मा उत्तम पारधी व तिची लहान बहीण फशा उत्तम पारधी या विळवंडी शिवारातील राजेंद्र पोपट पारधी यांच्या विहिरीवर हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी गेले असता, पाणी काढताना पाय घसरून पडल्याने दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

आकस्मिक मृत्यूची नोंद

तालुक्यातील विळवंडी येथे पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पाय घसरून बुडून मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. घटनेचा अधिक तपास दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण, धनंजय शिलावटे करत आहेत. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली  आहे.

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.