अगोदर निलंबन आता लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल; लाचलुचपत विभागासह एसपीची कारवाई

येवला (नाशिक) : शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येवला शहर पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल केला आहे. तसेच यापूर्वीच त्यांच्यावर जिल्हा पोलिस प्रमुखांनी त्यांचे निलंबनाची कारवाई केली होती. वाचा नेमके काय घडले?

असा आहे प्रकार

बाभूळगाव येथील घटना...दोन गटातील वादाच्या घटनेत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अतुल सुधाकर फलके यांच्यावर लाच मागितल्याची तक्रार केली होती. तक्रारदार व त्याच्या वडिलांकडे शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी अतुल फलके यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळापूर्व पथकाने २७ ऑक्टोंबरला पडताळणी केली. या तपासणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने बुधवारी (ता. १८) शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत त्यांची चौकशी झाली होती. त्यातील अहवालानुसार जिल्हा पोलिस प्रमुख सचिन पाटील यांनी त्यांना मागील आठवड्यात निलंबित केले आहे. लागोपाठ दोन कारवाई झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पाटील यांनी चुकीचे काम करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचा धडाका लावला. यापूर्वी तालुका पोलिस ठाण्यातील दोघांवर निलंबणाची कारवाई केली आहे. सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकून त्यांना न्याय मिळत असल्याने जिल्ह्यातून या कारवाईचे स्वागत होत आहे.