अग्नितांडवचे सत्र सुरुच : सकाळी उद्घाटन अन् रात्री दुकान आगीत खाक

मधुर स्विट दुकान www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

येथील सरदवाडी रोडवरील शनिवारी (दि.8) सकाळी उद्घाटन झालेल्या मिठाईच्या दुकानाला रात्री अचानक आग लागली. त्यात दुकान जळून खाक झाले. मिठाईसह दहा ते पंधरा लाखांचा माल आगीत भस्मसात झाल्याचा अंदाज आहे.

मूळचे राजस्थान येथील असलेले मिठालाल अण्णाजी माळी यांचे सरदवाडी रोडवरच मधुर मिठास नावाचे एक दुकान असून त्यांनी ही दुसरी शाखा सुरू केली होती. सरदवाडी रोडवर त्यांनी शनिवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते मिठाईच्या दुकानाचे थाटामाटात उद्घाटन केले. दिवसभर धावपळीत अन्नाचा एक कणही पोटात गेलेला नव्हता. त्यामुळे रात्री साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान मिठालाल जेवण करण्यासाठी घरी गेले. जेवण करून पुन्हा दुकानात यायचे अशा विचाराने दुकानालगतच्या गोडाऊनचे शटर त्यांनी अर्धवट बंद केले होते. मात्र जेवणाच्या ताटावर बसलेल्या मिठालाल यांनी पहिलाच घास तोंडात टाकला आणि दुकानाला आग लागल्याचा फोन आला. ते धावत पळतच दुकानाकडे आले. माजी नगरसेवक पंकज मोरे यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करीत कार्यकर्त्यांसह आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सिन्नर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. आगीचा भडका उडाल्याने एमआयडीसीच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. दोन्ही बंबांनी जवळपास दीड तास कसोशीने प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. मात्र मिठाईचे दुकान जळून खाक झाले. सकाळी उद्घाटन आणि रात्री आगीत दुकान खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नगरपालिका अग्निशमन दलाचे नवनाथ जोंधळे, लाला वाल्मिकी, जयेश बोरसे, सागर डावरे, लक्ष्मण सोनकुसरे आदींसह एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

हेही वाचा:

The post अग्नितांडवचे सत्र सुरुच : सकाळी उद्घाटन अन् रात्री दुकान आगीत खाक appeared first on पुढारी.