अजंग एमआयडीसीद्वारे तालुक्याच्या विकासाला चालना – कृषिमंत्री भुसे

मालेगाव (जि. नाशिक) : अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहत ८६३ एकर जमिनीवर साकारत आहे. या प्रकल्पामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊन मोठ्या प्रमाणात रोजगारनि  र्मिती होईल. बेरोजगारांच्या हातांना काम मिळेल, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. 

शहरातील मराठा दरबार सभागृहात झालेल्या उद्योजक संमेलनात ते बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे, औद्योगिक विकास महामंडळाचे शेख, उद्योजक विजयकुमार लोढा, रमेश जाजू, कैलास मेहता, खुर्शीद अन्सारी, ओम गगराणी आदी उपस्थित होते. 

भुसे म्हणाले, की मालेगाव शहर यंत्रमागाने सर्वत्र ओळखले जाते. या व्यवसायाला वसाहतीच्या माध्यमातून आधुनिकतेची जोड मिळेल. अजंग येथील प्रकल्पात फूड पार्कसाठी ९६, प्लॅस्टिक पार्कसाठी २७४, टेक्स्टाइल पार्कसाठी ४६ भूखंडांचे आरक्षण राहणार आहे. यासह लहान-मोठ्या उद्योजकांसाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरेल. याठिकाणी रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधांचे काम प्रगतिपथावर आहे. कृषी प्रक्रिया उद्योगामुळे कृषी क्षेत्रालाही चालना मिळेल. मर्यादित काळासाठी भूखंडाचे दर एक हजार ५८० वरून ६०० रुपये चौरस मीटर करण्यात आले आहेत. त्याचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, प्राधान्यक्रम ठरवावा. दर कमी करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले. नोंदणीप्रक्रिया सुरू होणार असल्याने तालुक्यातील तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा. तालुक्यातील उद्योजकांनी एकत्र येऊन तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली समिती गठित करण्याचे निश्‍चित करण्यात आले.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

उद्योगव्यवसाय वाढविण्यासाठी शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करू. महिला उद्योजकांना या ठिकाणी संधी उपलब्ध होण्यासाठी अनुदानात दहा टक्के अधिकचा लाभ देण्यात येणार आहे. . भामरे यांनी अजंग-रावळगाव प्रकल्पाची सविस्तर माहिती देत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. उद्योगव्यवसाय सुरू करताना ग्रुपच्या माध्यमातून उद्योग उभारल्यास प्रगती साधता येईल. प्रकल्पात नोंदणीसाठी लवकरच ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देऊ, असे सांगितले. शहर-परिसरातील उद्योजक, पदाधिकारी व विविध क्षेत्रांतील व्यापारी उपस्थित होते. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच