अजबच प्रकार! लस न घेताच लसीकरण झाल्याचा मेसेज; यंत्रणेचा फोलपणा उघड 

नांदगाव (जि.नाशिक) : आरोग्य यंत्रणेचा गलथानपणा थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी (ता. १७) दुपारी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा विसंवाद समोर येऊन काही तास उलटत नाही, तोच लसीकरणाच्या मोहिमेतील फोलपणा समोर आला आहे.

यंत्रणेचा फोलपणा उघड

हा किस्सा तालुक्यातील हिसवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. आठ दिवसांपूर्वी नांदगाव येथील ज्येष्ठ नागरिक जयंत कायस्थ यांना VM-NHPSMS ॲपवरून संदेश आला. हिसवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी (ता. १७) दुपारी लसीकरणासाठी जावे. त्याप्रमाणे कायस्थ हिसवळ केंद्रात लस घेण्यासाठी दुपारी तीनला पोचले. पण आता लस संपली आहे. उद्या या, असे केंद्रातील डॉक्टरांनी सांगितल्याने ते पुन्हा नांदगावला परतले. दुपारी ४.४१ ला ॲपवरून आलेल्या मेसेजने ते हैराण झाले. आपल्याला कोव्हिशील्ड लस यशस्वीरीत्या देण्यात आली आहे, असा संदेश त्यात होता. या संदेशामुळे मात्र कायस्थ व त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

आपल्याला पुन्हा लस मिळणार की नाही, या प्रश्नाने ते काळजीत पडले आहेत. नोंदणी झाल्यावर ती यशस्वी झाल्यानंतर पुन्हा नोंदणीसाठी त्यांनी प्रयत्न केला. मात्र नोंदणीचे ॲप ती घेत नसल्याची माहिती कायस्थ यांनी दिली. शहरात लसीकरण केंद्र नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या गावी असलेल्या केंद्रावर जायला प्रवासाच्या अडचणी निर्माण होत असल्याने नुकतेच शिवसेनेच्या संतोष गुप्ता यांनी तहसीलसमोर उपोषण केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी एका ज्येष्ठाला फुकटचा हेलपाटा पडला. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

ज्येष्ठांना कपाळावर हात मारण्याची वेळ

कोरोना लसीकरणासाठी एका ज्येष्ठाला मेसेज आला. ठरलेल्या वेळेनुसार ते लसीकरण केंद्रावर गेल्यावर लस संपली, असे सांगण्यात आले. त्यामुळे माघारी परतणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला लस घेतल्याचा मेसेज आला. झाल्या प्रकाराने आपल्याला लस मिळणार की नाही, या प्रश्नाने ज्येष्ठाला कपाळावर हात मारण्याची वेळ आली.