अजय बोरस्ते शिंदे गटाच्या नाशिक जिल्हाप्रमुखपदी

शिंदे गट जिल्हाप्रमुखपदी अजय बोरस्ते

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) नाशिक जिल्हाप्रमुखपदी माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्ह्याच्या  सहसंपर्कप्रमुखपदी राजू लवटे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे गटाचे प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपावली आहे.

या प्रसंगी महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी हे देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या 11 माजी नगरसेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये बोरस्ते व लवटे या दोघांचा समावेश होता. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नाशिकमधील ठाकरे गटाला मोठे भगदाड पाडण्याचे काम अजय बोरस्ते यांनी केले. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या 50 पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पदाधिका-यांना शिंदे गटात घेऊन जाण्यात बोरस्ते यांचा मोठा वाटा होता. त्याचवेळी बोरस्ते व लवटे या दोघांना मोठी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा होती.

तोच, नाशिकच्या जिल्हाप्रमुखपदी अजय बोरस्ते व संपर्कप्रमुखपदी राजू लवटे यांची निवड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

The post अजय बोरस्ते शिंदे गटाच्या नाशिक जिल्हाप्रमुखपदी appeared first on पुढारी.