अजित पवारांच्या गुगलीनंतर माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर! 

मालेगाव (जि.नाशिक) : शहरात राजकारणाचा मुद्दा केंद्रस्थानी असतो. निवडणुका असो वा नसो, चौकसभा सुरूच असतात. या वेळी शहरातील विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल हे म्यानमार कनेक्शनमुळे, तर माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने चर्चेत आले आहेत.

वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने सुरू

आसिफ यांचे वडील माजी आमदार रशीद शेख यांचे घराणे एक अपवाद वगळता गेली पाच दशके काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महापालिकेच्या कामकाजानिमित्त शेख पिता-पुत्रांचे मुंबई येथे जाणे झाले. मुंबई येथील भेटीत काँग्रेसच्या मंत्र्यांपेक्षा विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळ व सकारात्मक प्रतिसाद दिला. या गुगलीनेच आसिफ चितपट झाले. यातूनच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांची वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने सुरू आहे. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

शेख यांच्या पाठिशी पाठबळ नव्हते

महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने हस्तगत केली. राज्यात महाविकास आघाडी साकार होण्यापूर्वीच हा प्रयोग शिवसेना काँग्रेस युतीतून येथे आकाराला आला होता. यातच विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हवे तसे पाठबळ शेख यांच्या पाठिशी उभे केले नाही. प्रचाराला राज्य व राष्ट्रीय नेता फिरकला नाही. त्याचेही शल्य आसिफ शेख यांना होते. आमदार मौलाना मुफ्ती यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी एमआयएममध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते. मनपातील महाविकास आघाडीचे बहुसंख्य नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झाले आहेत. मौलाना मुफ्तींमुळे हे नगरसेवक एमआयएमकडे गेले. मात्र काहींचा ओढा अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी 

काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय

यातूनच व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्याने विकासकामांसाठी दोहो बाजूंवर हात ठेवण्याची रणनीती त्यांच्या काही समर्थकांनी अवलंबली. यातूनच महाविकास आघाडीचे काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. यातूनच आघाडीचे नगरसेवक अतिक कमाल यांचे मौलाना मुफ्ती यांच्याशी बिनसले. राष्ट्रवादीमध्ये नवीन सत्ता केंद्र निर्माण होऊ नये, भविष्यात मौलाना मुफ्ती यांनी राष्ट्रवादीची वाट धरू नये, या हेतूने आसिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. 

शेख कुटुंबीयांसाठी आव्हान 
समर्थकांशी चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा निर्णय घेऊ, असे शेख सांगत आहेत. मात्र एमआयएमला राज्यात जनाधार नाही. मुख्य विरोधकच त्या पक्षात आहेत. शिवसेना-भाजप प्रवेशाचा प्रश्‍नच नाही. अशा प्रसंगात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर जाणे हाच एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या आपुलकीच्या वागणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक चांगला मोहरा टिपता आला आहे. काँग्रेसची अवस्थाही बिकटच आहे. आगामी काळात आसिफ शेख यांचे वडील रशीद शेख काय निर्णय घेणार? महापालिका निवडणूक दोघा पिता-पुत्रांचे समर्थक कोणत्या पक्षाकडून लढविणार याविषयी उत्सुकता आहे. एकंदरीत मौलाना मुफ्ती यांचे म्यानमारच्या एक्बालशी असलेल्या कनेक्शनबाबत केंद्रीय गृहखात्यातर्फे सुरू असलेली चौकशी व आसिफ शेख यांच्या काँग्रेसला सोडचिठ्ठीमुळे शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. शेख पिता-पुत्रांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा वर्षभराआधीच बिगुल फुंकला आहे. दर शुक्रवारी प्रत्येक चौकात सभा होत आहे. आमदारकी गेल्यानंतर आगामी काळात महापालिकेची सत्ता राखणे शेख कुटुंबीयांसाठी आव्हान ठरणार आहे.