अजूनही चार रुपये तासाने भाड्याची सायकल! मालेगावात पन्नास वर्षांपासूनची परंपरा

मालेगाव (जि.नाशिक) : ‘सायकल, सायकल मनी सोनानी सायकल वं’ या खानदेशी गीताची प्रचीती गरिबीने विळखा घातलेल्या मालेगावातील हजारो कुटुंबीयांना रोज येते. रिक्षा, मोटारसायकलचा खर्च परवडणारा नसल्याने भाड्याच्या सायकलींवर सवारी करून अवघ्या चार रुपयांत तासाभरात कामे करणारे येथील कष्टकरी पन्नास वर्षांपासून सायकलवर फिदा आहेत. इंधन दरवाढीमुळे सायकलचे महत्त्व अधोरेखित होत असताना भाड्याच्या सायकलीची परंपरा मालेगावात प्रकर्षाने जोपासली जात आहे. 

पन्नास वर्षांपासूनची परंपरा
गरीब व कष्टकऱ्यांचे हक्काचे वाहन म्हणून सायकलकडे पाहिले जाते. एक-दोन तासांच्या कामासाठी रिक्षा किंवा मोटारसायकलचा वापर केला तर शंभर ते दीडशे रुपये मोजावे लागतात. याउलट भाड्याची सायकल दोन तास जरी घेतली तरी अवघ्या आठ रुपयांत काम होते. यातून पैशांची बचतही होते. मालेगाव वगळता इतर शहरांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीसाठी नागरिक सायकलच्या व्यायामाला प्राधान्य देतात. गरज म्हणून भाड्याची सायकल फिरवत येथील नागरिक तंदुरुस्तीबरोबरच आपली कामेही करीत असतात. मालेगाव आणि सायकल यांचे अतूट नाते आहे. शहरात लाखो सायकली दिवसभर विविध गल्ली-मोहल्ल्यांतून सैरभैर धावत असतात. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

७० ते ८० ठिकाणी भाड्याची सायकल 
मालेगाव यंत्रमाग कामगारांचे शहर मानले जाते. शहरातील मुस्लिमबहुल असलेल्या पूर्व भागातील बहुतांश नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. यात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांची संख्या लक्षणीय आहे. पन्नास वर्षांपासून सायकली भाड्याने मिळतात. सध्या शहरात ७० ते ८० ठिकाणी नागरिकांना सायकल भाड्याने दिली जाते. १९७० च्या सुमारास १० पैसे प्रतितास असा सायकलचा दर होता. महागाई वाढत गेली तसा सायकल भाड्याचा दरदेखील वाढत गेला. पन्नास वर्षांत चार ते पाच रुपये प्रतितास झाला आहे. केवळ ओळखीवर सहज व लगेच उपलब्ध होणारी सायकल नागरिकांना परवडणारी आहे. पेट्रोलची दरवाढ झाल्यामुळे रिक्षाचे भाडे वाढले आहे. कामगार व छोटे व्यावसायिकांना परवडणारी आहे. या व्यवसायामुळे शहरातील सातशे ते हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. सायकली या भागातील नागरिकांची जीवनरेषा मानली जाते. 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

दिवसभरासाठी लागतात २० रुपये 
शहरातील पॉवरलूम कामगार, दूधविक्रेते, फेरीवाले, पाव विकणारे आदी भाड्याच्या सायकलीचा वापर करतात. प्रतिदिवस सायकलीचा दर २० रुपये असतो. येथील सायकलीवर व्यवसाय करणाऱ्यांना दिवसभरासाठी केवळ २० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे शेकडो व्यावसायिक सायकलवरील व्यवसायाला प्राधान्य देतात. येथे सायकल दिवसागणिक लोकप्रिय होत आहे. लहान मुलांना खेळण्याचे साधन म्हणूनही छोट्या सायकली दोन रुपये तासाने मिळतात. सायंकाळी व सुटीच्या दिवशी येथे छोट्या सायकलींची गल्ली-मोहल्ल्यात गर्दी पाहायला मिळते.