अतिक्रमणधारकांकडून व्यावसायिक महिलेस मारहाण; मोहिम तीव्र करण्याचा इशारा 

नाशिक : वीर सावरकर पथवरील व्यावसायिक महिलेस रस्त्यावर व्यवसाय करणा-या अतिक्रमण धारकाने शिवीगाळ व मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मेनरोडवरील धुमाळ पॉईंटपासून थेट दहिपुलापर्यंत अतिक्रमणविरोधी मोहिम राबविल्याने कारवाईच्या भितीने या भागात रस्त्यावर व्यवसाय करणा-यांनी पळ काढला. 

मनपाने मोहिम राबवत अतिक्रमणे केली उदध्वस्त 
दिवाळीमुळे खरेदीदारांच्या उत्साहाने गत काही दिवसांपासून शहरातील वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी दुकानदार व्यावसायिक व फेरीवाले यांच्यात वादावादीचे प्रसंगही घडत आहे. काल वीर सावरकर पथावरील श्रृती कलेक्शनच्या संचालिका सीमा शुक्ल यांना रस्त्यावर व्यवसाय करणा-या काहीजणांनी शिवीगाळ करत मारण्याची धमकीही दिली.
 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

किरकोळ वादावादीचे प्रसंग

त्यामुळे या भागातील अनेक व्यावसायिकांनी थेट महापालिका मुख्यालय गाठत याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. दिवाळीनिमित्त शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिम काही काळापासून थांबविण्यात आली होती. मात्र आज दुपारी अकराच्या सुमारास दाखल झालेल्या अतिक्रमण विरोधी पथकाने धुमाळ पॉईंटपासून दहिपुलाकडे जाणा-या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. यावेळी अतिक्रमण विरोधी पथक, फेरीवाले विक्रेते व अन्य व्यावसायिकांत किरकोळ वादावादीचे प्रसंगही घडले.

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

अतिक्रमण मोहिम तीव्र करण्याचा इशारा

मोहिम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने काहीकाळ वाहतुकीची कोंडीही अनुभवण्यास मिळाली. आता दिवाळी संपली असून पुढील काळात अतिक्रमण मोहिम तीव्र करण्याचा इशाराही विभागाने दिला आहे.