अतिक्रमणधारक अन् विरोधी पथकात पाठशिवणीचा खेळ; शालिमार परिसरातील पळापळ नित्याचीच 

नाशिक : महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि शालिमार परिसरात हातगाडीद्वारे रस्त्यावर व्यवसाय करणारे यांच्यात गत काही दिवसांपासून पाठशिवणीचा खेळ सुरु आहे. अतिक्रमणविरोधी पथकाची गाडी दिसताच रस्ता दिसेल तिकडे धूम ठोकली जात असल्याने लहान-मोठे अपघातही घडत असल्याकडे यंत्रणा काणाडोळा करत आहे. 

शालिमार परिसर हा चोवीस तास वर्दळ असलेला शहराचा मुख्य भाग. या ठिकाणाची गर्दी हटविण्यासाठी काही वर्षांपूर्वी याठिकाणी व्यवसाय करणाऱ्या तिबेटी बांधवांना कॅनडा कॉर्नर भागातील तिबेटियन मार्केटमध्ये कायमस्वरूपी जागा दिल्यावर शहराचा मुख्य चौक असलेल्या शालिमार भागातील गर्दीवर अंकुश येईल, अशी अपेक्षा होती, परंतु, त्यानंतर काही काळातच या भागातील अनेकांनी जुन्या सिव्हिल हॉस्पिटलच्या भिंतीचा आधार घेत कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. त्यांना भाईगिरी करणाऱ्या काहींची साथही लाभली. सुरवातीला छोट्या स्वरूपात असलेले हा रस्त्यावरील बाजार जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू लागल्यावर या प्रश्‍नाकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लक्ष गेले. विशेष म्हणजे सुरवातीला छोट्या स्वरूपात असलेला हा बाजार आता थेट रस्त्याच्या मध्यापर्यंत येऊ लागल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला याची दखल घ्यावी लागली. 
 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

‘टीप’मुळे पोबारा 

अतिक्रमण खात्याची गाडी दिवसाच येथे व्यवसाय करणारे हातगाड्यांसह गल्लीबोळाकडे पळत सुटतात. यावेळी त्यांचे रस्त्याच्या परिस्थितीकडेही लक्ष नसते. त्यामुळे अनेकदा लहानमोठे अपघातही होत आहेत. अनेकदा या व्यावसायिकांना अतिक्रमणाची गाडी येणार असल्याची ‘टीप’ दिली जाते. विशेष म्हणजे सिव्हिलच्या भिंतीवर टांगलेले मोठ्या प्रमाणावरील ड्रेसही ते काही क्षणात खाली घेऊन पोबारा करतात. त्यामुळे बऱ्याचदा पथकाच्या हातात काहीच लागत नाही. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

व्यावसायिक त्रस्त 

एकीकडे स्वस्तात वस्तू मिळत असल्याने हातगाड्यांवर खरेदीसाठी अनेकांचा कल असतो, त्यामुळे रस्त्यावर गर्दी दुसरीकडे सर्व प्रकारचा कर भरणाऱ्या दुकानांत मात्र शुकशुकाट अशी परिस्थिती दिसून येते. दिवाळीपासून व्यवसाय निम्म्‍यावर आल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.