अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्तांना १३२ कोटींची प्रतीक्षा; दोन लाखांवर शेतकरी मदतीपासून वंचित

नाशिक : दिवाळीपासून जिल्ह्यातील दोन लाख चार हजार शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहेत. तीन लाख ६६ हजार शेतकऱ्यांपैकी एक लाख ६२ हजार शेतकऱ्यांच्याच खात्यावर अतिवृष्टीची मदत जमा झाली असून, उर्वरित नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा आहे. तर जिल्हा प्रशासनाला शासनाकडून १३२ कोटींचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. 

जून व जुलैमध्ये पाठ फिरवलेल्या या पावसाने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये राज्यासह जिल्ह्यात धुमाकूळ घातला. नाशिक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक पिकांना अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. कांदा, मका, भात, ज्वारी, सोयाबीन ही पिके अतिवृष्टीमुळे आडवी झाली. त्याचबरोबर भाजिपाल्यालाही फटका बसला. एकूणच हातातोंडाशी आलेले पीक आडवे झाल्याने शेतकरी संकटात सापडला. राज्य शासनाने युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून हेक्टरी दहा हजार व फळबागांना २५ हजार मदत जाहीर करत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे आश्वासन दिले होते. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

साडेतीन लाखांवर शेतकऱ्यांचे नुकसान 

जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे तीन लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण करत नुकसानभरपाईसाठी २४२ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला होता. दिवाळीनंतर त्यापैकी ११० कोटींची मदत जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. एक लाख ६२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत जमा करण्यात आली. मात्र, एक महिना लोटला तरी शासनाकडून अद्याप उर्वरित १३२ कोटींची मदत मिळणे बाकी आहे. दोन लाख चार हजार शेतकरी मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. मदतीपासून वंचित राहावे लागल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी मदतीविनाच गेली. त्यात आता पुन्हा अवकाळीचा दणका बसला.  

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप