अद्ययावत आदिवासी मुलींचे वसतिगृह उभारणार – ॲड. के. सी. पाडवी

म्हसरूळ (जि. नाशिक) : आदिवासी विद्यार्थिनींचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनीयुक्त आदिवासी मुलींचे वसतिगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले. पेठ रोड येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील नूतन इमारतीच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते. 

पाडवी म्हणाले, की या परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी विभागाची हक्काची जागा उपलब्ध असून, एकलव्य स्कूल, भरतीपूर्वी पोलिस प्रशिक्षण केंद्र असल्याने नक्कीच याचाही फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. भूमिपूजन झालेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाची सातमजली इमारत ही शहराच्या मध्यवर्ती भागात साकारणार आहे. या इमारतीची क्षमता ३१० विद्यार्थ्यांची आहे. या इमारतीत पार्किंग सुविधा, गरम पाण्यासाठी सोलर सिस्टिम, अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका, जेवणासाठी स्वतंत्र भोजनालयाची सुविधा व प्रत्येक मजल्यावर दोन वॉटर कूलरची सुविधा असणार आहे. या वसतिगृहासाठी एकूण रुपये तीन कोटी दहा लाख निधी मंजूर असून, दोन वर्षांत सुंदर इमारत उभी राहण्यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक ते प्रयत्न करण्यात येणार आहेत. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

या वेळी आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, नाशिक प्रकल्प अधिकारी वर्षा मिणा, अपर आयुक्त गिरीश सरोदे, आदिवासी विभाग उपायुक्त सुदर्शन नगरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, कार्यकारी अभियंता दिनेश बागूल, पंकजकुमार मेतकर आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO