अद्वय हिरे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

डॉ. अद्वय हिरे-पाटील www.pudhari.news

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क ; उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना आज मालेगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे.

अद्वय हिरे यांना पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतल्यानंतर आज मालेगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने 20 नोव्हेंबर पर्यंत पाच दिवसांची कोठडी त्यांना सुनावली आहे.

पक्ष अद्वय हिरे यांच्यासोबत

अद्वय हिरे यांच्यावर करण्यात येत असलेली कारवाई हा वेगळा विषय आहे. आम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्यांची साधी चौकशी नाही. मात्र, हिरे यांच्यावर थेट कारवाई होत आहे. मात्र, आमचा पूर्ण पक्ष अद्वय हिरे यांच्यासोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्यांची चौकशी झाली नसली तरी, जेव्हा सरकार बदलेल तेव्हा आम्ही ती करु असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. दरम्यान अद्वय हिरे यांच्यावरील कारवाईला राजकीय वास असल्याचा आरोप हिरे समर्थकांकडून होत आहे.

दादा भुसे यांचे कट्टर विरोधक

पूर्वीपासूनच अद्वय हिरे हे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. ते याआधी भाजपमध्ये होते, मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाची वाट धरली. त्यानंतर आगामी विधानसभेच्या निवडणूकीत दादा भुसे यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून अद्वय हिरे यांची उमेदवारी फिक्स असल्याचे समजते. त्यातूनच मालेगावात सध्या भुसे-विरुद्ध हिरे असा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसते.

The post अद्वय हिरे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.