अधिकच्या बिलासाठी रुग्णाला विनाउपचार डांबले कोविड कक्षात; अखेर वोक्हार्ट हॉस्पिटला बजावली नोटीस 

नाशिक : बेडचा तुटवडा, कुठे ऑक्सिजन नाही, तर कुठे रेमडेसिव्हिरचा काळा बाजार, अशा एक ना अनेक तक्रारी कोरोनाबाधित रुग्णसंदर्भात ऐकायला येत असताना, आता एका रुग्णावर उपचार पूर्ण होऊनही अधिकचे बिल काढण्यासाठी विनाउपचार कोविड कक्षात ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

अतिरिक्त बिलाची  मागणी

जळगाव येथील कोरोनाबाधित एक रुग्ण २५ मार्चला उपचारासाठी दाखल झाला. ५ एप्रिलपर्यंत रुग्ण उपचाराअंती ठणठणीत झाल्यानंतर घरी सोडण्याची मागणी केली. मात्र, रुग्णालय प्रशासनाने घरी न सोडता अजून उपचाराची गरज असल्याने तीन दिवस कुठलेही औषध न देता बेडवर झोपवून ठेवले. त्यापूर्वी वैद्यकीय विम्याची साडेपाच लाख रुपयांची रक्कम जमा करून घेतली. तीन दिवस फक्त झोपवून ठेवल्यानंतर अतिरिक्त एक लाख ८५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याचे संबंधित रुग्णाने सांगूनही दाद न दिल्याने सिडकोतील नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे तक्रार केली.शुक्रवारी (ता. ९) वोक्हार्ट हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

तीन दिवसांत विनाउपचार रुग्णाला बेडवर झोपवून का ठेवले?

नगरसेवक शहाणे यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे परिस्थिती कथन केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, लेखापरीक्षक बोधिकिरण सोनकांबळे व महापालिकेचे डॉ. पावसकर यांच्या पथकाला रुग्णालयात सर्च ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्या. नगरसेवक शहाणे यांच्यासह रुग्णालयात पोचलेल्या पथकाला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पीपीई किट घालून संबंधित रुग्ण असलेल्या वाॅर्डात प्रवेश केल्यानंतर रुग्णाने परिस्थिती कथन केली. सर्च ऑपरेशननंतर रुग्णाला तत्काळ सोडून देण्यात आले. रुग्णालय व्यवस्थापनाला नोटीस बजावली असून, तीन दिवसांत विनाउपचार रुग्णाला बेडवर झोपवून का ठेवले, याचा खुलासा मागविला आहे. 

 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

बेडबाबतही अनियमितता 
रुग्णाची कोंडी फोडल्यानंतर वोक्हार्ट रुग्णालयाची झाडाझडती घेण्यात आली. सेंट्रल बेड रिझर्वेशन सिस्टिममध्ये माहिती अपडेट केली जात नसल्याचे निदर्शनास आले. रुग्णांच्या नातेवाइकांना योग्य माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. सरकारी नियमाप्रमाणे बिले आकारली जात नसल्याच्या तक्रारीनंतर नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिली. 

गिरीश महाजन यांच्याकडून दखल 
जळगाव येथील उल्हास कोल्हे यांनी वोक्हार्ट हॉस्पिटलबाबत निवडणुकीनिमित्त पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली. श्री. महाजन यांनी भाजपचे सिडकोमधील नगरसेवक मुकेश शहाणे यांना दूरध्वनीवरून त्याबाबत माहिती दिली व रुग्णाला सहाय्य करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हालचाली गतिमान झाल्या. नगरसेवक शहाणे यांनी तातडीने आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे धाव घेऊन परिस्थिती कथन केली. 

अधिकच्या बिलासाठी डांबले कोविड कक्षात 

दीड महिन्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. एक लाख ३५ हजारांहून अधिक रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. शहरातील महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालये पूर्णपणे भरली आहेत. महापालिकेच्या डॅशबोर्डवर बेड रिक्त असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांकडून बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने रुग्णालयांचे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. आठ दिवसांत सहा खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. रुग्णाच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या पथकाने वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन करून रुग्णाची सुटका केली व रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावली. 

जळगाव येथील एक रुग्ण बरा होऊनही त्याला रुग्णालयात डांबून ठेवल्याची तक्रार प्राप्त झाली. रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता, चुकीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या पथकासह रुग्णालयात धडक मारावी लागली. 
-मुकेश शहाणे, नगरसेवक