अनोखी प्रेमकहाणी : लंडनची जॉर्जिया अन् मालेगावचा कृष्णा पवार विवाहबंधनात

मालेगाव विवाह,www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
उत्तराखंडमधील योगा शिबिरात त्यांची भेट झाली, गाठी – भेटी वाढल्या अन् स्वभाव जुळल्याने प्रेम बहरले. शिबिरानंतर ती लंडनला आणि मुलगा घरी परतला. कुटुंबाला आपल्या भावना सांगत संमती मिळवत सर्वांच्या राजीखुशीने दोघांचा धुमधडाक्यात विवाह झाला. एखाद्या चित्रपटातील कथानकाला साजेशी ही प्रेम कहाणी मालेगावच्या युवकाच्या बाबतीत घडली आहे.

मूळचा मालेगावचा कृष्णा पवार हा आयटी इंजिनियर असून, सध्या तो नोकरीनिमित्त हाँगकाँगमध्ये वास्तव्याला आहे. तो योग शिबिरासाठी उत्तराखंडमध्ये आला होता. याच शिबिरात लंडनच्या जॉर्जियाशी त्याची पहिली भेट झाली. दोघांचा संवाद वाढला आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्धार करीत दोघे कुटुंबात परतले. घरच्यांना माहिती देत त्यांचा होकारही मिळविला. नाशिकमध्ये विवाहसोहळा करण्याचे निश्चित झाले.

त्यानुसार मंगळवारी (दि. 5) महिरावणीतील हॉटेल आनंद रिसॉर्टमध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. जॉर्जियाचे वडील पॅट्रिक डोनोगिव्ह आणि आई मिशेल डोनोगिव्ह यांच्यासह आप्त उपस्थित होते. कृष्णा हा मालेगावचे माजी शिक्षणाधिकारी मोठाभाऊ पवार यांचा मुलगा आहे.

हेही वाचा :

The post अनोखी प्रेमकहाणी : लंडनची जॉर्जिया अन् मालेगावचा कृष्णा पवार विवाहबंधनात appeared first on पुढारी.