‘अन्यथा पोलिसांना कळविण्यात येईल’ पतंग विक्री दुकानांवर झळकले फलक 

नाशिक : ‘नायलॉन मांजा मागू नये, अन्यथा पोलिसांना कळविण्यात येईल’ अशा आशयाचे फलक पतंग विक्री दुकानावर झळकत आहेत. यातून खरेच नायलॉन बंदी होईल का, अशी चर्चा परिसरात सुरू होती. सामाजिक भान असलेल्या दुकानदारांनी फलक लावले असले, तरी काही दुकानदार मात्र सर्रास मांजाची विक्री करीत आहेत. 

काही दुकानदारांकडून मात्र सर्रास मांजाची विक्री
नायलॉन मांजाने गळा चिरण्याच्या शहरात तीन घटना घडल्या आहेत. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. नायलॉन मांजाच्या बेकायदा विक्रीमुळेच अशा घटना घडत आहेत. दुसरीकडे ‘नायलॉन मांजा विक्रीस बंदी आहे. मागणी केल्यास पोलिसांना कळविले जाईल’ अशा आशयाचे फलक लावण्याच्या सूचना पोलिसांनी दुकानदारांना केल्या आहेत. सामाजिक भान असलेल्या दुकानदारांनी तसे फलक लावले. मात्र यातून काय साध्य होणार? नायलॉन मांजा विक्री आणि मागणी बंद होईल का? असे झाले तर काही वर्षांपूर्वीच मांजा विक्री बंद झाली असती. फलकाने काही साध्य होणार नाही. पोलिसांनी धडक कारवाई सुरूच ठेवावी.

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

पतंग विक्री दुकानांवर झळकले फलक 

नायलॉन मांजा विक्रेत्यांसह उत्पादक आणि मांजा खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करावी, तरच यावर अंकुश लागू शकतो. मकरसंक्रांतीस अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. गुरुवारी (ता. १४) मकरसंक्रांती आहे. यानिमित्त पतंग आणि मांजा खरेदी-विक्री वाढली आहे. शेवटच्या दिवसांत चोरीछुपे नायलॉन मांजा विक्रीला जोर येतो. मोबाईलवरून ग्राहक विक्रेत्यांशी संपर्क साधून मांजा खरेदी करतो. यामुळे पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रीबाबत अधिक दक्ष राहण्याची आवश्‍यकता आहे.  

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच