..अन्यथा राज्यात एकही कांदा नाही देणार; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे इशारा  

नाशिक : ..अन्यथा राज्यात एकही कांदा ‘नाफेड’ला दिला जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी रविवारी येथे दिला. 

अन्यथा राज्यात एकही कांदा नाही देणार 
बाजारातील कांद्याचे भाव घसरले, की ‘नाफेड’ शेतकऱ्यांकडून आठ ते दहा रुपये किलो भावाने कांद्याची खरेदी करत ‘बफर स्टॉक’ करते. प्रत्यक्षात मात्र एकरी ७० ते ८० हजार रुपयांच्या खर्चाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नाफेड’ने किलोला ३० रुपयांचा भाव द्यावा, दिघोळे म्हणाले, की ‘नाफेड’ दर वर्षी कांद्याचा ‘बफर स्टॉक’ करण्यासाठी राज्यातील काही ठराविक बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करत असते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून बाजार समित्यांच्या खरेदीसह काही फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांनाही ‘नाफेड’ने कांदा खरेदीचे अधिकार दिले आहेत. गेल्या वर्षी ‘नाफेड’च्या एक लाख टन कांदा खरेदीपैकी महाराष्ट्रातून ७५ हजार टन कांदा खरेदी करण्यात आली होती. त्या वेळी ‘नाफेड’ने शेतकऱ्यांच्या किलोला आठ ते अकरा रुपये इतका दर दिला होता. फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना ‘नाफेड’ने हा दर ठरवून दिल्याने त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना हा दर मिळाला होता. परंतु ‘नाफेड’ची कांद्याचा दर ठरविण्याची ही पद्धत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मान्य नसून या वर्षी महाराष्ट्रात ‘नाफेड’मार्फत शेतकऱ्यांना किलोला ३० रुपये भाव द्यावा. कारण खते, औषधे, बियाणे, मजुरी व डिझेलचे दर वाढले असताना अवकाळी-गारपिटीसह बोगस बियाणे अशा कारणांनी कांदा उत्पादनाचा खर्च वाढला आहे. म्हणूनच उत्पादन खर्चापेक्षा अधिक पैसे शेतकऱ्यांना मिळणे आवश्‍यक आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप 
गेल्या वर्षी ‘नाफेड’ने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याला पाचपट म्हणजेच कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर ४० ते ५० रुपये किलो असा विक्रीचा भाव मिळाला. मुळातच, ‘नाफेड’चे काम नफा कमावण्याचे नाही, तर कांद्याचे भाव वाढल्यानंतर देशातील ग्राहकांना स्वस्ताईत कांदा पुरविण्यासाठी किमती स्थिरीकरण योजनेंतर्गत खरेदी करणे हे असते. मात्र गेल्या वर्षी खरेदीपेक्षा विक्रीचा अधिकचा भाव मिळूनही ‘नाफेड’ने शेतकऱ्यांना वाढीव मोबदला दिलेला नाही. ही शेतकऱ्यांची उघडपणे फसवणूक आहे, असा आरोप दिघोळे यांनी केला आहे.  

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ