नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले असून क्रांती मोर्चाने आता आक्रमक भुमिका घेतली आहे. समाजातील विद्यार्थ्यांचे प्रश्न येत्या २ डिसेंबरपर्यंत मार्गी न लागल्यास राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबागेवर मोर्चा व जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडुका मोर्चा काढण्याचा इशारा आजच्या बैठकीतून देण्यात आला. दरम्यान उद्या (ता.२९) मोर्चाची पुणे येथे राज्यव्यापी बैठक होत असून त्याठिकाणी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.
समाजाच्या भावना पवार यांच्यापर्यंत पोहोचविणार
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यावर विद्यार्थांचे शैक्षणिक प्रवेश, स्पर्धा परिक्षांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्यांचा मुद्दा धोक्यात आला. त्यातून मार्ग काढण्यासाठी मोर्चाने आघाडी सरकारसमोर एसईबीसी, सुपर न्युमररीसारखे काही पर्याय ठेवले होते. परंतु त्यानंतरही आघाडी सरकारने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्याने समाजात संतप्त भावना आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मराठा समाजाचा मोर्चा बारामतीतील गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी मोर्चा काढून समाजाच्या भावना पवार यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. याशिवाय नाशिकच्या जलल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा काढण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला.
बैठकीला करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, राजू देसले, शिवा तेलंग, उमेश शिंदे, कुंदन हिरे, पूजा धुमाळ, रोहिणी दळवी, किरण जाधव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आडगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली
हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार
बैठकीतील बोल
१) मुख्यमंत्री खरे जातीयवादी
२) ॲड. सदावर्तेंना पैसे व अन्य मदत करणारे अधिकारी शोधा.
३) केवळ मंत्रीच नव्हे तर आरक्षणाआड येणा-या अधिका-यांना झोडपण्याचा इशारा.
४) समाजाला डावलून भरती झाल्यास महाराष्ट पेटविण्याचा इशारा.
५) रखडलेली नियुक्ती पत्रे देण्याची मागणी.
समाजातील मुले अधिकारी झाल्यास आपला झेंडा कोण हाती धरणार? याभावनेतून सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजातील युवकांचा निवडणुकीपुरता वापर करून घेतात, असा आरोप बैठकीत करण्यात आला. राज्य लोकसेवा आयोगाद्वारा डिवायएसी म्हणून निवड झालेल्या नांदेड येथील विश्वनाथ वडजे या विद्यार्थाने ज्यांच्या नियुक्त्या झाल्या, त्यांना नियुक्तीपत्रे देण्याचा आग्रह बैठकीत धरला. अन्य काही युवक युवतींनीही नियुक्तीपत्रांचा आग्रह बैठकीत धरला.