…अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल! संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस; महावितरणला इशारा

निफाड (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यात पाच ते सात वर्षांपासून अस्मानी, अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील वर्षी कोरोनाने त्यात भर टाकली. या सर्व संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे द्राक्ष, गहू, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु आता महावितरण कंपनीने शेतकऱ्यांवर धाडसत्र सुरू करून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ही कारवाई थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला. 

ही कारवाई थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू
अस्मानी संकटातून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करतो. तोच सरकारने लॉकडाउनचे संकेत देताच व्यापाऱ्यांकडून या संधीचा फायदा घेतला जात आहे. एकरी तीन लाख रुपये खर्च करून निर्यातक्षम द्राक्ष पिकवायचे. ते १५ रुपये किलोने म्हणजेच मातीमोल विकण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे. 

शेतकऱ्यांच्या गरजा व भावना लक्षात घ्या
सरकारने शेतकऱ्यांसाठी ५० टक्के बिले भरून संपूर्ण वीजबिल माफीची योजना आहे. परंतु शेतकऱ्यांच्या गरजा व भावना लक्षात घेऊन या योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे. महावितरणने धाडसत्र थांबवावे अन्यथा शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्था झुगारून विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देताना देवेंद्र काजळे, कादवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब शंखपाळ, मधुकर ताकाटे, रमेश गायकवाड, मनोज मोरे, निवृत्ती ताकाटे, गणपत जगताप, अशोक मेधणे, बाळासाहेब जाधव, जालिंदर बनकर, वैभव केणे आदी उपस्थित होते. 

 

अस्मानी संकटांनी व कोरोनामुळे शेतकरी त्रस्त आहेत. महावितरणने धाडसत्र सुरू केले आहे ते थांबवावे, अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल. शेतकऱ्यांची वीजतोडणी थांबवा व कंपन्यांकडून शंभर टक्के वसुली करा. -देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते 

 

शेतकऱ्यांना आठ तास वीज द्यायची आणि शंभर टक्के वीजबिले वसुली करायची. कंपन्यांना पूर्ण वेळ वीज द्यायची आणि त्यांच्या थकबाकीबाबत सरकारने गप्प बसायचे. शेतकरीवर्गाला त्रास द्यायचा, हे उचित नाही. 
-भाऊसाहेब शंखपाळ, कादवा पाणी वापर संस्था कारसूळ