…अन् संतप्त युवक चढला तहसील कार्यालयाच्या छतावर; अनोखे सिनेस्टाईल आंदोलन!

नांदगाव (जि.नाशिक) : नेहमीचेच समजून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महसूल विभागाला छतावर आंदोलन होत आहे, याची साधी कल्पनाही नव्हती. जिल्हास्तरीय महसूल यंत्रणेतील वरिष्ठांना  तालुक्यातील कोलमडून पडलेल्या आपल्या विभागाच्या अनागोंदीची साधी पुसटशी कल्पनाही नव्हती. दलालाच्या विळख्यात सापडलेल्या तहसीलमधील प्रशासकीय कामकाजात सुधारणा होण्याची गरज या आंदोलनातून अधोरेखित झाली.

संतप्त युवक चढला तहसील कार्यालयाच्या छतावर

ढिम्म  यंत्रणा साध्या विषयासाठी अडवणूक करीत असल्याच्या घटनाक्रमात वाढ होत असून, येथील महसूल विभागातील  कामे मार्गी लागत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. २५) संतप्त युवकाने तहसील कार्यालयाच्या छतावर चढून अनोखे आंदोलन केले. विशेष म्हणजे आपले काम मार्गी लागत नाही म्हणून या आंदोलनाचे लेखी पत्र पंधरा दिवसांपूर्वी तहसीलदारांना  त्याने दिले होते. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

सिनेस्टाईल आंदोलन  केल्याने  कार्यालयात  खळबळ

आंदोलन, उपोषण केल्याशिवाय काहीच मिळत नाही, अशी स्थिती तालुक्याची झाली आहे. सातबारा  उतारा  व  इतर  अधिकाऱ्यांना मंडळाचे  अधिकारी त्रास  देत असल्याची  तक्रार  करूनही  त्याची  दखल  तहसीलदारांनी  घेतली नाही. म्हणून  दर्शन  शिंदे  या  शेतकऱ्याने  नवीन  तहसील  कार्यालयाच्या इमारतीच्या  कौलांवर चढून  सिनेस्टाईल आंदोलन  केल्याने  कार्यालयात खळबळ  उडाली. इमारतीच्या बाहेरून छतावर आंदोलक चढला. अर्धा तास गेल्यानंतर  अकराला  तहसीलदार  उदय  कुलकर्णी  त्याठिकाणी आले. त्यांनी दर्शनचे  काम  दोन  दिवसांत  करून  देतो,  असे आश्वासन  दिल्यानंतर  तो छतावरून  खाली  उतरला. यासंदर्भात  तहसीलदारांना  नवीन  तहसील कार्यालयाच्या  इमारतीवर  चढून  आंदोलन  करण्याचा इशारा  १८ फेब्रुवारीला देण्यात आला  होता.  केवळ गट न. ३१३ या उताऱ्यावर नाव लावण्याचा प्रश्न होता. वारंवार चकरा मारूनही काम होईना म्हणून तहसीलदारांकडे तक्रार केली. तरीही दखल घेण्यात आली नाही. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

‘महसुली काम अन् सहा महिने थांब'
या अनोख्या आंदोलनाची चर्चा तालुक्यात काही तासांत पोचली. त्यामुळे प्रशासनातील उणिवा व नाकर्तेपणाच्या चर्चेला उधाण आले. ढिम्म,  निरंकुश प्रशासनावर  कोण निर्बंध घालणार,  अशा  अनेक  प्रश्नांची  उत्तरे  नांदगावकर मागू  लागली  आहेत. ‘महसुली काम अन् सहा महिने थांब' या म्हणीपलीकडे प्रशासन गेले असून, तक्रार अर्जांना केराची  टोपली  दाखवली  जाते.  याचे  उदाहरण  म्हणून दर्शन शिंदे याच्या प्रकरणाकडे बोट दाखवले जात आहे.