अपंगदिनाच्या पूर्वसंध्येला दिव्यांग मानधनाविनाच; निराधार योजनेसाठी तीन महिन्यांपासून चकराच

सिडको (नाशिक) : जागतिक अपंगदिनाच्या पूर्वसंध्येला दिव्याग बांधव संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या मानधनापासून तीन महिन्यांपासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे.

निराधार योजनेसाठी तीन महिन्यांपासून चकराच

केंद्र व राज्य शासनाकडून ४० ते ४५ टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांगांना दर महिन्याला मानधन दिले जाते. दिव्यांग व्यक्तीला जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अपंगत्व असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. पन्नास हजारांच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील दिव्यांगांना प्रशासकीय कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यास दर महिन्याला एक हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. गेल्या काही महिन्यांपासून या दिव्यांग लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत एक रुपयादेखील मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर कोरोनाच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे. उद्या सगळीकडे अपंगदिन साजरा होणार आहे. मात्र जागतिक अपंगदिनाच्या पूर्वसंध्येलाही दिव्यांगांची परवडच होती.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानधनामुळे आमच्या घराला आर्थिक आधार मिळतो. परंतु कोरोनाच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे आम्हाला मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्याची त्वरित प्रशासनाने दखल घ्यावी. - बाळासाहेब घुगे, अध्यक्ष-भाजप दिव्यांग आघाडी, सिडको

दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरात लवकर मानधन जमा करण्यात येईल. याकरिता संबंधित लाभार्थ्यांनी आपले पासबुक बँकेत जाऊन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. तसेच काही अडचण असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. - दीपाली गवळी, अधिकारी, संजय गांधी निराधार योजना, नाशिक