अपात्र लाभार्थींकडून दोन कोटींबाबत टाळाटाळ; होणार सक्तीची कारवाई

सिन्नर (नाशिक) : ऑगस्ट २०१९ पासून सुरू झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान मानधन योजनेचा लाभ अपात्र व्यक्तींच्या खात्यात जमा झाला असून, काही पात्र लाभार्थींचा लाभ दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याची बाब समोर आली आहे. सिन्नर तालुक्यात नोव्हेंबरअखेर केवळ ६१८ अपात्र लाभार्थींनी ६२ लाख ८० हजार रुपये शासनास परत केले आहेत. अजून एक कोटी ९० लाख रुपयांची रक्कम वसूल होणे बाकी असल्याने या रकमेच्या वसुलीसाठी आठ दिवसांची मुदतवाढ देत तहसीलदारांनी संबंधित अपात्र लाभार्थीना सक्तीच्या कारवाईचा इशारा दिला आहे.

अपात्र लाभार्थीना सक्तीच्या कारवाईचा इशारा

ऑगस्ट २०१९ पासून सुरू झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान मानधन योजनेचा लाभ अपात्र व्यक्तींच्या खात्यात जमा झाला असून, काही पात्र लाभार्थींचा लाभ दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याची बाब समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संगणकीय प्रणालीतून ही बाब पुढे आली आहे. अपात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम परत करण्यात सांगण्यात आले आहे. मात्र, संबंधितांकडून ही रक्कम परत करण्यास टाळाटाळ होत असून, सिन्नर तालुक्यात नोव्हेंबरअखेर केवळ ६१८ अपात्र लाभार्थींनी ६२ लाख ८० हजार रुपये शासनास परत केले आहेत. अजून एक कोटी ९० लाख रुपयांची रक्कम वसूल होणे बाकी असल्याने या रकमेच्या वसुलीसाठी आठ दिवसांची मुदतवाढ देत तहसीलदारांनी संबंधित अपात्र लाभार्थीना सक्तीच्या कारवाईचा इशारा दिला आहे.

तहसील कार्यालयात विशेष कक्ष सुरू

पीएम सन्मान निधीचे वार्षिक सहा हजार रुपये अनुदान वितरित करताना अपात्र व्यक्तीच्या खात्यात किंवा पात्र लाभार्थींचा लाभ दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे प्रकार घडले आहेत. अशा प्रकरणांबाबत अपात्र, मृत व्यक्तीच्या किंवा चुकीच्या खात्यात जमा झालेली लाभाची रक्कम शासनास परत करण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (एसओपी) प्रणाली निर्गमित केलेली आहे. सिन्नर तालुक्यातील अपात्र लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्यावर जमा झालेल्या लाभाची रक्कम परत करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात तहसील कार्यालयात विशेष कक्ष सुरू केला आहे.

तालुक्यातील सर्व अपात्र लाभार्थ्यांना १५ ऑक्टोबर २०२० च्या आदेशाने संबंधित गावात नेमलेल्या पालक अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा बजावल्या होत्या. पीएम किसान सन्मान योजनेचा मिळालेला चुकीचा लाभ शासनास तत्काळ परत करण्यास नोटिसीद्वारे सांगण्यात आले होते. मात्र, नोव्हेंबरअखेर केवळ ६१८ अपात्र लाभार्थींनी त्यांच्याकडील रकमेचा भरणा सरकारी तिजोरीत केला असल्याचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी सांगितले.

...अन्यथा सक्तीची कारवाई

एक कोटी ९० लाख रुपये इतकी रक्कम वसूल होणे बाकी आहे. बहुतांश अपात्र लाभार्थी त्यांना संधी देऊनही शासनास रक्कम जमा करण्यास टाळाटाळ करत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशा पात्र लाभार्थींना पुन्हा एक संधी देण्यात येत आहे. त्यांनी येत्या आठ दिवसांत रक्कम रोखीने किंवा धनादेशाद्वारे तहसील कार्यालयशेजारील नवीन प्रशासकीय भवनात सुरू झालेल्या पीएम किसान योजना कक्षात जमा करावी अन्यथा सक्तीची वसुलीची कारवाई होईल, असा इशारा तहसीलदारांनी दिला आहे.