अपूर्व हिरेंच्या भाजपमध्ये पक्षांतराच्या वावड्या थंड; चर्चेला काहीअंशी पूर्णविराम

सिडको (नाशिक) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अपूर्व हिरे भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या केवळ वावड्या उठवण्यात आल्याचे हिरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हिरे समर्थकांमध्ये उठलेले वादळ सध्या तरी शमलेले दिसून येत आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी करणारे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला काही दिवसांपासून उधाण आले असताना आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे अपूर्व हिरे यांच्या गटाकडून जाहीर केल्याने पक्षांतराच्या चर्चेला काहीअंशी पूर्णविराम मिळाला आहे. 

पक्षांतराच्या चर्चेला काहीअंशी पूर्णविराम 

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीला अवघे एक वर्षे बाकी आहे. असे असताना पक्षांतराचे वारे काहीअंशी वाहू लागले आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी मुंबईत भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तर भाजपमध्ये असलेल्या दोन बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचा झंझावात सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काही कार्यक्रमानिमित्ताने नुकतेच नाशिक शहरात परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आले होते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे व देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यामुळे त्या दिवशी दिवसभर हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर २१ जानेवारीला मुंबईत ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. तशा प्रकारच्या पोस्ट त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर देखील टाकल्याचे बघायला मिळाले. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

परंतु, स्थानिक भाजपच्या काही नेत्यांचा हिरे यांना विरोध असल्याने प्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याच्या चर्चेला उधाण आले होते. परंतु, यासंदर्भात हिरे यांच्या गोटातून माहिती काढली असता, अशा कोणत्याही प्रकारचा प्रवेश होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, अपूर्व हिरे यांनीदेखील अशा कुठल्याही प्रकारचा प्रवेश नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तूर्तास हिरे यांचा भाजप प्रवेशाच्या व पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिरे समर्थकांमध्ये काही दिवसांपासून पक्षांतराचे उठलेले वादळ सध्या तरी शमलेले दिसून येत आहे.  

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच