अपूर्व हिरेंच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वातावरण ढवळले! प्रतिक्रिया युद्ध सुरू

सिडको (नाशिक) : काही दिवसांपासून माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अपूर्व हिरे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठविण्यात आल्या होत्या. परंतु, त्याबाबत हिरे व त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्टीकरण दिल्याने प्रवेशाचा हा विषय थांबला होता.

प्रतिक्रिया युद्धा’ने राजकीय वातावरण चांगलेच ढवळले

मात्र, भाजप उद्योग आघाडीचे नेते प्रदीप पेशकार यांनी हिरे यांच्यावर प्रवेशाबाबत चांगलीच खरमरीत टीका केली. ही प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच झोंबली व त्यांनीदेखील त्याच पद्धतीने पेशकार यांना सडेतोड प्रतिक्रिया दिल्याचे दिसून आले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजपच्या या ‘प्रतिक्रिया युद्धा’ने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याचे यानिमित्ताने दिसून आले. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

 

भाजप म्हणजे धर्मशाळा नाही. कोणत्याही परिस्थितीत व कुणीही डॉ. अपूर्व हिरे यांना पक्षात घेणार नाही. इतके हलक्यात कोणी घेऊ नये. जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत कोणीही हिरेंची वकिली करू नये. काही जुन्या स्वयंघोषित नेत्यांना दुसऱ्या पक्षातील लोक मोठे वाटत असतील. त्यांनी खुशाल वकिली करावी. परंतु, अशांना आता पक्ष भीक घालणार नाही. 
- प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष, उद्योग आघाडी, भाजप 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

अहो, पेशकारसाहेब भीक घालता कोणाला, हिरे यांच्या चार पिढ्यांनी समाजकारण आणि राजकारणात सर्वसामान्य जनतेसाठी काम केले आहे. हे महाराष्ट्र जाणतो. त्यांनी कधीही कोणालाही भीक घातली नाही. उलट सर्वसामान्य जनतेसाठी भाऊ त्यांच्या दुःखात धावून गेले आहेत. कधी-कधी स्व:पक्षात आपले स्थान बळकट करण्यासाठी, असे बेताल विधान काही जणांना करावे लागते. तुमचे पक्षश्रेष्ठी मुंबईत भाजप कार्यालयात प्रवेश देतात, यासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे उदाहरण बोलके ठरते. तेव्हा कोणाविषयी बोलतो, याचे तारतम्य बाळगा. - अनिता भामरे, शहराध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, नाशिक