अफवांवर विश्‍वास ठेऊ नका! दहावी-बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच 

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये बदल होत असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याने यावर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २३ एप्रिल ते २१ मे २०२१ यादरम्यान दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा होणार आहेत. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल आणि बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा ५ ते १२ एप्रिल यादरम्यान होणार आहे. परीक्षा सुरक्षित व सुरळीत पाडण्याच्या अनुषंगाने बोर्डाद्वारे आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र तरीदेखील काहींकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

दहावी-बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच
अफवांच्या पार्श्वभूमीवर मंडळाकडून सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रक काढून या प्रकराच्या माहितीवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, यात काही बदल झालाच तर त्यासंबंधीची माहिती मंडळाच्या संकेतस्थळ, शाळा, महाविद्यालयांना देण्यात येईल. त्यांनी दिलेली माहितीच ग्राह्य धरावी, असेही सांगितले आहे. एप्रिलमध्ये नियोजित प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांसंदर्भात मंडळाकडून पुढील दोन दिवसांत मार्गदर्शन सूचना देण्यात येणार आहेत.  

 

हेही वाचा  - नाशिकमध्ये कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन आढळला