अबब! 40 फुटांपर्यंत कारंजा…बोअरवेलमधील वीजपंपाची रॉकेटभरारी, परिसरात घबराटही अन् कुतुहलही

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामधील चिखलआंबे या गावात रविवारी (दि.17) दुपारी 2.30 च्या सुमारास वसंत वामन आमले यांच्या शेतातील बोअरवेलमधून अचानक तब्बल 30 ते 40 फुटांपर्यंत अर्धा तास पाण्याचा फवारा आकाशात उडण्याचा प्रकार घडल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली होती. या बोअरवेलमधील वीजपंप हा साडेतीनेशे फुटांच्या पाइपसहित एखाद्या रॉकेटसारखा पाण्याच्या या प्रचंड फवार्‍यासह बाहेर फेकला गेला. जोरदार फवार्‍यामुळे परिसरात घबराट आणि कुतुहल निर्माण झाले होते.

गेल्या दोन-तीन दिवसांत परिसरात जोरदार पाऊस झाला. आमले यांनी आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी 350 फुटांपर्यंतचा बोअर काही काळापूर्वी खोदलेला होता. परंतु रविवारी दुपारी अचानक चमत्कार घडावा तसे हे बोअरवेल जिवंत झाले. त्यातून वीजपंप तसेच 350 फूट लांबीचे पाइप पाण्याच्या प्रचंड फवार्‍यासह आकाशात एखाद्या रॉकेटसारखे फेकले गेले. या नैसर्गिक आपत्तीत आमले यांचे मोठे नुकसान झाले. आमले यांनी यासंदर्भात चिखलांबे गावचे तलाठी उदय नेहर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली आणि तेही पाण्याचा प्रचंड फवारा पाहून चकीत झाले. त्यांनी चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनाही या घटनेची माहिती दिली. त्यांनी याची दखल घेत याबाबत भूगर्भशास्त्र विभागाशी संपर्क साधून हा प्रकार नेमका कशामुळे झाला, याबाबत चौकशी केली.

हे आहे नेमके कारण….
भूगर्भातील खोलवरील खडकांच्या थरांमधील पाणीसाठा कमी झाला की, हवेची पोकळी तयार होते. पावसाळ्यात सगळीकडून पाणी जमिनीत मुरते आणि पाण्याच्या पातळीत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ होते. पाण्यामुळे दाबाचा केंद्रबिंदू ज्या ठिकाणी तयार होतो, तेथून प्रचंड दाब असलेली हवा आणि पाणी बाहेर पडते. दाब जास्त प्रमाणात असल्यास बोअरवेलमधील वीजपंप आणि पाइपही वर उचलले जाऊन वेगाने बाहेर फेकले जाते, अशी माहिती भूगर्भशास्त्र विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. लांबच्या अंतरावरून पाण्याचे फवारे दिसत असल्याने जमिनीत काहीतरी घडत आहे काय, याची भीती शेतकर्‍यांना वाटत होती. परंतु भूगर्भशास्त्र विभागाच्या अधिकार्‍यांनी या प्रकारामागील भौगोलिक कारण स्पष्ट केल्यानंतर भीती काही अंशी दूर झाली.

हेही वाचा :

The post अबब! 40 फुटांपर्यंत कारंजा...बोअरवेलमधील वीजपंपाची रॉकेटभरारी, परिसरात घबराटही अन् कुतुहलही appeared first on पुढारी.