अभिनय ही शिकण्याची बाब नाही : अभिनेते अशोक सराफ

अशोक सराफ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हल्ली अभिनय शिकवण्यासाठी शिबिरे, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. पण अभिनय ही शिकण्याची बाब नसून, आपल्यात ती असणे गरजेचे आहे. मी माझे मामा रंगकर्मी गोपीनाथ सावकार यांच्याकडे बघून अभिनयाकडे प्रेरित झालो. त्यांनी मला अभिनय शिकवला नाही, तर मी त्यांच्याकडे बघून अभिनय शिकलो. त्यामुळे अभिनय ही शिकवण्याची बाब नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास सभागृहात ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासचा सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमात लेखक विजय निपाणेकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर उपस्थित होते. यावेळी अशोक सराफ यांनी 1971 पासूनच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. अभिनयाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘अभिनय हा आपल्या मनात असायला हवा. जसे की, तुम्हाला रागवायचे असा सीन असेल. तर यामध्ये वेगवेगळ्या भावमुद्रा करून रागवता येऊ शकते. मात्र, द़ृश्याला अपेक्षित काय? त्यानुसार रागवण्याची खुबी ही आपल्यात यायला हवी. लहान असताना मी माझे मामाकडे बघून अभिनयाकडे वळालो. पूर्वी संगीत नाटक केली जायची. त्यामुळे कॉमेडी आणि टायमिंग याची सांगड घालण्याची एक वेगळीच कला मी त्यांच्याकडून आत्मसात केल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या ‘मी बहुरूपी’ या पुस्तकाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘मी लेखक नाही तर एक नट आहे. त्यामुळे मी नट म्हणून हे पुस्तक लिहिले. आयुष्यात आलेले चांगले-वाईट अनुभव त्यामध्ये मांडले. त्यामुळे तो एक आठवणींचा संग्रह आहे. ग्रंथालीने हे पुस्तक आणले नसते तर कदाचित कोणीच आणू शकले नसते. 1971 ते 2021 या 50 वर्षांतील या पुस्तकात सार आहे. हे पुस्तक वाचनातून लोकांना किती कळाले हे सांगणे मुश्किल आहे. मात्र, त्यातील चित्र नक्कीच लोकांना भावले असतील, असे मला वाटते. दरम्यान, याप्रसंगी अशोक सराफ यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती स्टोअर्सचे वसंत खैरनार यांनी केले. याप्रसंगी शंकराचार्य न्यासचे प्रमोद भार्गवे, ग्रंथालीच्या व्यवस्थापिका धनश्री धारक उपस्थित होत्या. कार्यक्रमात आयर्न मॅन डॉ. सुभाष पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने नाशिककर उपस्थित होते.

भुजबळ माझे दैवत
तात्यासाहेब शिरवाडकर या अत्यंत ताकदीच्या लेखकांच्या नाटकातून अभिनयाला सुरुवात केली, हे मी माझे भाग्य समजतो. त्याचबरोबर वसंतराव कानिटकर यांच्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकातही काम करण्याची संधी मिळाले. माधव मनोहर या अत्यंत कडक शिस्तीच्या व्यक्तीसोबत काम करणे नक्कीच सोपे नव्हते. माझ्या ते नंबर एकचे नाट्य समिक्षक होते. तसेच छगन भुजबळ यांचेही खूप प्रेम मिळाले. त्यांनी दोन चित्रपटांची निर्मिती केली, त्या दोन्ही चित्रपटांत मी नट होतो. ते नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. ते माझे दैवत आहेत. असा माणूस होणे नाही, अशा शब्दांत अभिनेते अशोक सराफ यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे कौतुक केले.

हेही वाचा :

The post अभिनय ही शिकण्याची बाब नाही : अभिनेते अशोक सराफ appeared first on पुढारी.