अभिनेत्री स्पृहाने नाशिकला अनुभवला शेतकऱ्यांच्या जगण्याचा आनंद! पर्यटनासोबत घेतलं जीवनशिक्षण

नाशिक : चित्रपट, नाट्य अन्‌ दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधील अभिनेत्री कवयित्री स्पृहा जोशीने मुंबईतून बाहेर येत कृषीपंढरी नाशिकमध्ये येऊन मोकळी हवा, निसर्ग मनसोक्त अनुभवला. एवढंच नव्हे, तर ‘ग्लॅमर'च्या पल्याड इथल्या शेतकऱ्यांच्या जगण्याचा आनंद स्पृहाने अनुभवातून घेतला.

‘रेस्यूड्यू फ्री‘ द्राक्षांबद्दलची यू-ट्यूब चॅनल, सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती करण्यासाठी दोन दिवस चित्रीकरण करते आहे. इथं पर्यटनाला यायच अशी सुरवातीला भावना होते, परंतु मी जीवनशिक्षण घेतले आहे, अशी उस्फुर्त प्रतिक्रिया स्पृहा जोशीने व्यक्त केली. 

सेंद्रीय भाजीपाल्याविषयी सृहाची जनजागृती

सेंद्रीय भाजीपाल्याविषयी जनजागृती करण्यात योगदान देण्यास स्पृहाने सुरवात केली आहे. त्याच्या पुढचे पाऊल म्हणून तिने सेंद्रीय शेतमालासाठी कीटकनाशके, रासायनिक औषधांचा वापर केला जात नाही, हे पाहिले. हाच अनुभव ती आता आपल्या चाहत्यांना चित्रफितीच्या माध्यमातून सांगणार आहे. आज दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतचे चित्रीकरण झाल्यावर ‘ग्रीनफिल्ड ॲप'चे संचालक अमोल गोऱ्हे यांच्या वडनेरभैरव (ता. चांदवड) येथील शेतावर पत्रकारांशी मुक्तसंवाद साधला. मुंबईकरांना गोऱ्हे ॲपच्या माध्यमातून आठवड्यातून एकदा भाजीपाला, फळे पोचवताहेत. मुंबईत द्राक्षांचा महोत्सव व्हावा, मुंबईच्या वेगवेगळ्या भागात क्लस्टर विकसित व्हावेत यादृष्टीने गोऱ्हे यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासंबंधाने स्पृहाच्या जनजागृतीची मदत होईल, असा विश्‍वास गोऱ्हे यांनी मांडला. संजय पवार, उमेश राठी यांच्या शेतात स्पृहाने चित्रीकरण केले आहे. स्पृहाच्या सोबत संदेश घुगे, कपील इंगोले, वैभव शेतकर हे मुंबईहून आले आहेत. ‘उंच माझा झोका’ मालिकेतील रमाबाई रानडेंची भूमिका साकारणाऱ्या स्पृहाच्या मोरया आणि देवा या चित्रपटात भूमिका आहेत. याशिवाय ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट', ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट' याही मालिकांमधून स्पृहाने भूमिका साकारलेली आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

‘ऑ’च्या आले बाहेर 

स्पृहा म्हणाली, की दोन दिवसातील अनुभव माझ्यासाठी नक्कीच नवीन आहे. या अनुभवामुळे मी ‘ऑ’ च्या बाहेर आले. केवळ सेंद्रीय शेती नव्हे, तर कृषी क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग, चार पैसे मिळवून देणाऱ्या पिकांमधून रोजगार निर्मितीला चालना मिळत असताना माणसं उभी राहिल्याचे मी पाहिले. त्याच्याशी माझं जगणं अवलंबून आहे, हे अनुभवल्याने शेतकऱ्यांशी अधिकची जवळीक वाटू लागली आहे. खरे म्हणजे, आपल्या ताटात सहज मिळतयं. पण त्यामागे किती श्रम आहेत याची जाणीव झाली. ग्रीन फिल्ड ॲपच्या माध्यमातून भाजीपाला माझ्या घरी आला. शिवाय रोज बाजारातून भाजीपाला विकत घेत होते. स्वाभाविकपणे दोन्ही प्रकारच्या भाजीपाल्यापैकी सेंद्रीय भाजीपाल्याची चव नक्कीच वेगळी वाटली. तसेच, हा सेंद्रीय भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी किती उपकारक आहे, याची जाणीव प्रकर्षाने झाली आहे. 

अनुभवाची साखळी प्रत्येकाने गुंफावी 

सेंद्रीयच्या नावाखाली आपण डोळेझाकून विश्‍वास ठेवत विकत घेतो. पण हो ! आपल्याकडे सेंद्रीय शेती पाहण्याचा पर्याय उपलब्ध आहे म्हटल्यावर त्याचा वापर प्रत्येकाने करायला हवा. हा पर्याय मी वापरला असून, त्यातून आलेले अनुभव मी इतरांना सांगणार आहे. त्यातून सेंद्रीय शेतमालाच्या माहितीची एक साखळी तयार होईल. अशीच साखळी इतर प्रत्येक जण अनुभव घेऊन तयार करु शकतो, असेही स्पृहाने सांगितले. ही चर्चा सुरु असताना एका आकाराच्या आणि हिरव्या भाज्या म्हणजे, चांगल्या भाज्या अशी काहीशी भावना मुंबईकरांमध्ये असल्याचेही चर्चेतून पुढे आले. मग स्पृहाने गोड द्राक्षे हा केवळ एकच निकष नसल्याचे शेतकऱ्यांशी झालेल्या संवादातून समजल्याचे स्पष्ट करत द्राक्षांचा विषय अभ्यासक्रमात नसल्याने त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी द्राक्षांची चव घ्यायला हवी, असे अधोरेखित केले. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच