अभिमानास्पद! नाशिकच्या युवा सायकलपटूची धडाकेबाज कामगिरी; गीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

इंदिरानगर (नाशिक) : शनिवारी (ता. २१) दुपारी दोनला नाशिकच्या ओम महाजन (वय १७) या युवा सायकलपटूने गीनिज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये आपल्या नावाची मोहोर उमटवली. काश्मीर ते कन्याकुमारी हे चार हजार किलोमीटरचे अंतर त्याने आठ दिवस सात तास आणि ३८ मिनिटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण केले. हा विक्रम नोंदवताना त्याने भारताच्याच कर्नल भरत प्रन्नू यांचा आठ दिवस नऊ तासांचा विक्रम मोडीत काढला.

खाणे आणि जलपानदेखील सायकलिंग करतानाच

अमेरिकेतील खडतर अशी रॅम सायकल स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय सायकलपटू डॉ. महाजन बंधूंपैकी डॉ. हितेंद्र महाजन यांचा ओम मुलगा आहे. विशेष म्हणजे भरत यांनी डॉ. महेंद्र महाजन यांचा २०१८ चा दहा दिवस नऊ तासांचा विक्रम मोडला होता. आता भरत यांचाही विक्रम मागे टाकत ओमने परत एकदा महाजन कुटुंबात हा बहुमान परत आणला आहे. १३ नोव्हेंबरला पहाटे पाचला त्याने श्रीनगर येथून ही मोहीम सुरू केली होती. रोज साधारण ४५० किलोमीटर अंतर पार करताना तो २४ तासांत अवघे दोन तास विश्रांती घेत होता. खाणे आणि जलपानदेखील सायकलिंग करतानाच केले.

‘बी कुल... पेडल टू स्कूल’ हे घोषवाक्य

दरम्यान, गीनिज बुकसोबतच त्याने वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशन (WUCA) चा यापूर्वीचा विक्रमदेखील मोडीत काढला आहे. शुक्रवारी (ता. २०) त्याला २७ तासांत ५६० किलोमीटर अंतर कापायचे होते. ते त्याने सुमारे दोन तास आधीच पूर्ण करून शहरवासीयांना ही भेट दिली. नाशिक येथील फ्रावशी ॲकॅडमीचा तो विद्यार्थी आहे. पाचवीपासून बारावीपर्यंत शाळेत तो सायकलद्वारेच जात असे. नुकताच त्याने अमेरिकेत स्पोर्ट्स मॅनेजमेंट या पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनिंमध्ये सायकलचा वापर वाढावा, हा मुख्य संदेश देण्यासाठी त्याने या मोहिमेचे ‘बी कुल... पेडल टू स्कूल’ हे घोषवाक्य ठेवले आहे.

जसपालसिंग बिरदी यांना ही मोहीम अर्पण

नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांना ही मोहीम अर्पण केली होती. महाजन बंधू फाउंडेशन व नाशिक सायकलिस्टतर्फे या मोहिमेची आखणी करण्यात आली. श्रीनगर, दिल्ली, झाशी, नागपूर, हैदराबाद, बेंगळुरू, मदुराईमार्गे कन्याकुमारी असा मार्ग होता. नितीन ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महाजन बंधू, डॉ. अंजना महाजन, डॉ. नितीन रौंदळ, मिलिंद वाळेकर, सागर बोंदार्डे, पूर्वांश लखलानी, बलभीम कांबळे, कबीर राचुरे, नेहा पाटील आणि राहुल भांड यांच्या ‘टीम ओम इंडिया’ने या मोहिमेचे संयोजन केले.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

आजचा विश्‍वविक्रम करत नाशिकचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्याचे मोठे समाधान आहे. शाळेपासूनच सायकलद्वारे सर्वत्र ये-जा करण्याची सवय लागली. त्याचा मोठा फायदा झाला. - ओम महाजन, विक्रमवीर सायकलपटू

लहानपणापासून असलेली सायकलिंगची आवड आणि त्याला दिलेली कठोर मेहनतीची जोड, यामुळे हे यश त्याने मिळवले आहे. एक कुटुंब म्हणून नाशिक सायकलिस्ट असोसिएशन आणि सायकलिंग परिवारातील प्रत्येक सदस्याचा या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे. - डॉ. हितेंद्र महाजन, ओमचे वडील

माझ्या नावावर असलेले रेकॉर्ड पुन्हा एकदा ओमच्या निमित्ताने महाजन परिवारात आल्याचा मोठा आनंद आहे. इतक्‍या कमी वयात हा विक्रम करणे हे नाशिकच नव्हे तर प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. - डॉ. महेंद्र महाजन, माजी विक्रमवीर

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या