अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेसाठी नाशिक केंद्राला मंजुरी; विद्यार्थ्यांची गैरसोय दूर

नाशिक : महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी पुढील वर्षापासून नाशिक येथे केंद्र मंजूर करण्यात आले आहे. लोकसेवा आयोगाकडून उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे. केंद्र मंजुरीची माहिती मिळताच उत्तर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षार्थींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगामार्फत राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी नाशिक हे परीक्षा केंद्र असले तरी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी नाशिक येथे केंद्र नव्हते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना शुक्रवारी कळविले. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी नाशिक केंद्र नसल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. विद्यार्थ्यांनी खासदार गोडसे यांची भेट घेऊन साकडे घातले होते. चार महिन्यांपासून खासदार गोडसे महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रशासनाशी संपर्क साधून होते.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

पूर्वपरीक्षार्थींमध्ये आनंदाचे वातावरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शुक्रवारी परीक्षा केंद्रासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पुढील परीक्षेच्या वेळेपासून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी नाशिक येथे केंद्र मंजूर करण्यात आल्याचा निर्णय पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव अवताडे यांनी खासदार गोडसे यांना कळविला आहे. या केंद्राच्या सोयीमुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार आदी जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. केंद्र मंजुरीची माहिती मिळताच उत्तर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षार्थींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार