अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेला एक हजार ७२६ उमेदवारांची दांडी 

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी (ता. २७) राज्‍यभरात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा २०२० अंतर्गत लेखी परीक्षा पार पडली. नाशिक जिल्ह्यात सहा हजार १८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी चार हजार २९२ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर एक हजार ७२६ परीक्षार्थींनी दांडी मारली. 

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे राज्‍य सेवा पूर्वपरीक्षेप्रमाणे अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेकरिता मार्गदर्शक तत्त्वे जारी केले होते. तसेच कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर विशेष उपाययोजना केलेल्‍या होत्‍या. दुसरीकडे उमेदवारांना सूचना जारी केलेल्‍या होत्‍या. त्‍यानुसार प्रवेशपत्र डाउनलोड करून सोबत आणणे अनिवार्य केले होते. वेळापत्रकावर नमूद अंतिम वेळेनंतर प्रवेश दिला जाणार नसल्‍याचे स्‍पष्ट केले होते. परीक्षा सुरू होण्याच्‍या वेळेपूर्वी दीड तास आधी हजर राहाणे अनिवार्य केले होते. तसेच परीक्षा केंद्रावर येताना मूळ ओळखपत्र व सोबत छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य केलेले होते. दरम्‍यान, नाशिक जिल्ह्यात चौदा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्‍या संयोजनासाठी ४६० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केलेली होती. परीक्षेकरिता सहा हजार १८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चार हजार २९२ उमेदवारांनी उपस्‍थित राहत परीक्षेला सामोरे गेले. एक हजार ७२६ उमेदवारांनी दांडी मारली.  

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ