‘अमरधाम’च्या कर्मचाऱ्यांना मास्क, हॅंडग्लोव्हजचा विसर; स्वत:सह आप्तस्वकीयांचे आरोग्य धोक्यात 

नाशिक : अमरधाममध्ये पारंपरिक पद्धतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार विधी करणारे कर्मचारी पीपीई कीट, तर दूरच मास्क आणि हँडग्लोव्हजचाही वापर करत नाही. यामुळे ते स्वतःसह त्यांचे कुटुंबीय तसेच अमरधाममध्ये येणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत. 

अमरधाममधील कर्मचाऱ्यांना मास्क, हॅंडग्लोव्हजचा विसर
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सरकार, जिल्हा प्रशासन, महापालिकेतर्फे प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. दुसरीकडे शहरातील मुख्य अमरधाममध्ये सेवा देणारे कर्मचारी मात्र विनामास्क, हँडग्लोव्हज, पीपीई किटचा वापर करत मृतदेहांवर अंत्ससंस्कार करीत आहेत. नैसर्गिकरित्या मृत झालेल्यांसह कोरोनाने मृत झाले देह मोठ्या अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी येत आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालणे अनिवार्य आहे. किट नसेल तर हँडग्लोव्हज, मास्क यांचा वापर करावा, अशा सूचना महापालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

स्वत:सह आप्तस्वकीयांचे आरोग्य धोक्यात 

प्रत्यक्षात मात्र विद्युत दाहिनी सोडली तर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी त्यांचा वापर करत नाहीत. अशा वेळेस त्याना कोरोनाची बाधा झाल्यास त्यास जबाबदार कोण इतकेच नव्हे, तर त्यांच्यामुळे त्यांचे कुटुंबीय, अमरधाममध्ये येणारे नागरिक त्यांच्या संपर्कात येऊन कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. तरीदेखील दुर्लक्ष केले जात आहे. 
या बाबत माहिती जाणून घेतली असता, अमरधाममध्ये केवळ महापालिकेचे दोनच कर्मचारी असून, त्यांना महापालिकेकडून पीपीई किट, मास्क, हॅंडग्लोव्हजसह अन्य आवश्‍यक वस्तू पुरविल्या जातात. सध्या २० पीपीई किट असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. पारंपरिक पद्धतीने अर्थात लाकडांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी ठेकेदार पद्धतीवरील आहे. त्यांच्याकडून काही वेळी या गोष्टींचा वापर केला जात नाही.

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

महापालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष

लाकडांमुळे हॅंडग्लोव्हज फाटून जातात. चिता रचण्यासह विविध कामे करत असताना मास्कसारखा निघत असतो. त्यामुळे त्यांच्याकडून त्यांचा वापर करणेच बंद करण्यात आले आहे. शिवाय ते ठेकेदार पद्धतीवरील कर्मचारी असल्याने ठेकेदाराकडून त्यांना मास्क, हॅंडग्लोव्हजचा पुरवठा करण्यात आलेला नाही किंवा बंधनकारक करण्यात आलेले नाही. परिणामी त्यांच्यासह आप्तस्वकीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून हा प्रकार थांबविणे आवश्‍यक आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्येही कर्मचारी विनामास्क आणि हँडग्लोव्हजने अंत्यसंस्कार करताना दिसून आले. तरीदेखील महापालिकेकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. 

अमरधामधील महापालिका कर्मचारी वगळता ठेकेदार पद्धतीवरील कर्मचारी मास्क आणि हॅंडग्लोव्हजचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने गांभीर्य ओळखून त्यांनादेखील मास्क आणि हॅडग्लोव्हजचा पुरवठा करावा. 
- गणेश बर्वे, जिल्हा चिटणीस, युवासेना 

काही दिवसांपूर्वी मित्राच्या अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये गेलो असता. त्याठिकणी कार्यरत कर्मचारी विनामास्क आणि हँडग्लोव्हजने अंत्यसंस्कार करत असल्याचे दिसून आले. कोरोनाबाधित मृतदेहांवरही अशाच प्रकारे अंत्यसंस्कार केले जात असतील, तर ते धोकादायक आहे. 
-संजय मोरे (सामान्य नागरिक)