अमानुष प्रकार! दहावर्षीय चिमुरड्याला चटके देऊन मारहाण; कृत्याने परिसरात संतापाची लाट

देवळा (जि. नाशिक) : मेंढ्या सांभाळणाऱ्या अवघ्या दहावर्षीय बालकाला निर्दयपणे काठीने मारहाण करत शरीरावर चटके दिल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील खर्डे येथे घडला. या अमानवीय घटनेने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील लळिंगबारी येथील दहावर्षीय बालकाला सध्या देवळा तालुक्यातील खर्डे येथे वास्तव्यास असणारा मेंढपाळ सागर डुकळे याने मेंढ्या सांभाळण्यासाठी ठेवून घेतले होते. मेंढ्या सांभाळत नाही, तसेच सांगितलेले काम ऐकत नाही म्हणून १५ ते २० दिवसांपासून त्याने वेळोवेळी काठीने पाठीवर तसेच, हाता-पायावर मारहाण करून, शरीरावर चटके देऊन दुखापत केली आहे. सागर डुकळे या मारहाण करणाऱ्या नराधमास देवळा पोलिसांनी अटक केली. बालकांचे सरंक्षण अधिनियम २०१५ कलम ७५ व भादवी कलम ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

मुलगा बालकल्याण समितीकडे स्वधीन

खर्डे येथील प्रहार युवाजनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष बापू देवरे, पोलिसपाटील भरत जगताप, हेमराज कुवर, मुन्ना जाधव, भाऊसाहेब मोरे, आबा जगताप यांनी पीडित बालकाची सुटका करून त्याला देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अमानवीय घटनेबाबत देवळा पोलिसांत बापू देवरे यांनी फिर्याद दिली. देवळा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सागर डुकळे याला अटक केली. पीडित बालकाला नाशिकच्या उंटवाडी रोड येथील बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. 

कठोर शिक्षा करण्याची मागणी

लहान मुलाला क्रूरतेने मारणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून समाजात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
याबाबत देवळा पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, खंडेराव भवर, सुनील पवार पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना