अर्थसंकल्पाबाबत सत्ताधाऱ्यांकडून स्वागत, विरोधकांकडून चिमटे! संमिश्र प्रतिक्रिया  

पंचवटी (नाशिक) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मांडलेल्या दुसऱ्या अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्यासाठी भरीव तरतूद असल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षाकडून, तर अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचा सूर विरोधी पक्षांनी व्यक्त केल्याने अर्थसंकल्पाचे शहर व जिल्ह्यात संमिश्र स्वागत झाल्याचे दिसून येते. 

सत्ताधाऱ्यांकडून स्वागत, विरोधकांकडून चिमटे 
नाशिकच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा अर्थसंकल्प आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद आहे. धार्मिक भूमीच्या विकासासाठी सिन्नर गोंदेश्वर मंदिर जतन संवर्धन, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थस्थळ विकास, संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर विकास, श्रीक्षेत्र सप्तशृंगगड विकासासाठी निधीची तरतूद केली आहे. त्याचबरोबर पुणे ते नाशिकच्या मध्यम अतिजलद रेल्वेमार्गाचे काम हाती घेण्यासाठी निधी देत नाशिकच्या निओ मेट्रोसाठी राज्य सरकारने वाट्याची तरतूद केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिल्ह्यातर्फे आभार मानण्यात येत आहेत. -समीर भुजबळ, माजी खासदार 

 

पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारने एक रुपयाही कमी केला नाही. गुजरातपेक्षा मुंबई, नाशिकला पेट्रोल दहा रुपयांनी महाग आहे. काही योजनांचे स्वागत करतो. पण कुठलीही प्रभावी योजना लागू केलेली नाही. महिलांसाठी विशेष उपाययोजना नाहीत. या अर्थसंकल्पात जनतेची घोर निराशा झाली आहे -सीमा हिरे, आमदार 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

राज्यातील महाविकास आघाडीचे नाशिक जिल्ह्यावर विशेष प्रेम असल्याने अर्थसंकल्पाद्वारे जिल्ह्यासाठी भरीव तरतूद आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्गासह एज्युकेशन हब, अन्नप्रक्रिया उद्योग, निओ मेट्रोसाठी भरीव तरतूद यासह शेतकरी वीजबिलातील सवलतींमुळे हा अर्थसंकल्प सर्वांना भरभरून देणारा व सर्वसमावेशक आहे. -ॲड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 

केलेली भरीव तरतूद स्वागतार्ह. याशिवाय पर्यटनवाढीसही चालना देणारा. समृद्धी, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, पायाभूत सुविधांमुळे दिलासा. मात्र कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेले छोटे, सूक्ष्म लघुउद्योग, छोटे व्यापारी यांच्यासाठी अर्थसंकल्पात भरीव काहीच नसल्याने या क्षेत्राची निराशा. -संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रिकल्चर 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

अर्थसंकल्पातून बाजार समित्यांच्या सक्षमीकरणाच्या तरतुदीचे स्वागत. मात्र असंघटित घरेलू कामगार, मोलकरीण यांच्यासाठी भरीव काहीच नाही. इंधन दरवाढीबाबत अर्थसंकल्पाद्वारे दिलासा मिळणे आवश्‍यक होते, परंतु तसे झाले नाही. -कॉ. राजू देसले, भाकप, राज्य सचिव मंडळ सदस्य 

 
आजच्या अर्थसंकल्पातून तरुण, महिलावर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, नाशिक-पुणे रेल्वेसाठी भरीव तरतूद, वीजबिलात सवलत त्यामुळे हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने विकासाभिमुख आहे. -शरद आहेर, राज्य उपाध्यक्ष, अ. भा. काँग्रेस पक्ष 

अर्थसंकल्पात नाशिक-पुणे रेल्वेसह समृद्धी महामार्गासाठी भरीव तरतूद केली आहे. शिवाय बळीराजासाठी तीन लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, तरुणांना बेरोजगारी भत्ता हे राज्यासह जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. -डॉ. वसंत ठाकूर, शहराध्यक्ष, काँग्रेस सेवादल 

राज्यातील आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा, त्यांची फसवणूक करणारा आहे. याद्वारे कोरोनाग्रस्तांना कोणताही दिलासा दिलेला नाही. केंद्राच्या योजनांवर जगत असलेल्या सरकारने मांडलेला हा निराशाजनक व शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविणारा अर्थसंकल्प. -लक्ष्मण सावजी, राज्य चिटणीस, भाजप 

नाशिककरांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. आतापर्यंत नाशिक दत्तक घेणाऱ्यांनी भरभरून मते घेतली परंतु नाशिकला काही देणे सोडाच परंतु ओरबाडण्यापलीकडे काही दिले नाही. नाशिक-पुणे रेल्वेमार्गामुळे औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल. आयटी उद्योग नाशिकमध्ये येतील. ठाकरे सरकारचे अभिनंदन! -अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते 

कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही राज्य व नाशिकला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. अर्थसंकल्पामुळे नाशिकला अधिक फायदा होणार आहे. रेल्वे, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा उभारताना इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सेंटर उभारले जाणार आहे. 
नाशिक मेट्रो निओ प्रकल्पासाठी दोन हजार १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. -रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस