नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी प्रशासक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला. यंदा हा अर्थसंकल्प ५८ कोटी ९९ लाखांचा आहे. त्यामध्ये १८ कोटी २० लाख रुपयांची मागील वर्षाची शिल्लक, तर ४० कोटी ८५ लाख रुपयांच्या अपेक्षित रकमेचा समावेश आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जमेच्या बाबींमध्ये वाहन कर हा १८ हजार ४८५ रुपये, व्यवसाय कर १ लाख ८३ हजार ५७० रुपये, जमीन महसुलावरील उपकर ९० लाख रुपये, स्थानिक उपकराचे सापेक्ष अनुदान १ कोटी १० लाख रुपये, मुद्रांक शुल्क अनुदान १० कोटी रुपये, पाणीपट्टीवरील उपकर १० लाख रुपये, व्याज व इतर २७ कोटी ५३ लाख ५०० रुपये असे एकूण ४० कोटी ८५ लाख २ हजार ५५५ रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या बाबींमध्ये समावेश आहे.
दरम्यान, आगामी आर्थिक वर्षामध्ये विभागांनी प्रस्तावित केलेल्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक शाळांच्या देखभाल दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी २ कोटी ३० लाख रुपये, प्राथमिक शाळेमध्ये सायन्स रूम तयार करण्यासाठी १ कोटी रुपये, सुपर १०० योजनेसाठी १ कोटी ५० लाख, प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी स्पेलिंग बी स्पर्धा राबविण्यासाठी २० लाख रुपये, ग्रामीण भागातील मागासवर्गीय बेरोजगारांना मालवाहतूक चारचाकी वाहनासाठी अर्थआहाय्यासाठी ३ कोटी ८६ लाख रुपये, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी घरकुल योजनेसाठी २ कोटी २७ लाख ५० हजार रुपये, मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणासाठी ३० लाख रुपये, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचलित औजारांसाठी अनुदान ३० लाख रुपये, ट्रॅक्टर खरेदी अनुदानासाठी १ कोटी ३५ लाख रुपये, कोटा बंधारे दुरुस्तीसाठी ६० लाख रुपये तसेच सर्व विभागांतील सेवा अद्ययावत करण्यासाठी १ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
चार नव्या योजनांचा समावेश
यंदाच्या अर्थसंकल्पात चार नवीन योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान रूम तयार करणे, सुपर १००ची योजना, प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेलिंग बी स्पर्धा तसेच तालुकास्तरीय संसाधन केंद्र विकसित करणे यांचा समावेश करण्यात आला आहे.
सन २०२४-२५ साठी विभागनिहाय तरतूद (कोटींत)
शिक्षण विभाग : ७.०७
आरोग्य विभाग : १.२८
बांधकाम १,२,३ : १७.३५
समाजकल्याण : ३.९०
दिव्यांग कल्याण : २.३०
महिला व बालविकास : ३.०५
ठेव संलग्न गटविमा योजना : ०.५०
पंचायतराज : १०.९७
कृषी विभाग : २.५८
पशुसंवर्धन विभाग : १.३४
लघु पाटबंधारे विभाग : ०.६१
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : ८.०५
एकूण : ५९.००
कर्मचाऱ्यांचा क्रीडा महोत्सव वाढता वाढता वाढे
गेल्या तीन वर्षांत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या क्रीडा महोत्सवासाठी असणाऱ्या निधीमध्ये वर्षानुवर्षे वाढ होताना दिसत आहे. २०२२-२३ साठी ८ लाख रुपये निधीची तरतूद होती. २०२३-२४ साठी १० लाख रुपये, तर आता २०२४-२५ च्या बजेटमध्ये तब्बल २५ लाखांची तरतूद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवासाठी करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी शिक्षण विभागाकडून दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अध्यक्ष चषकासाठी गेल्या तीन वर्षांपासून फक्त २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांचे कल्याण करायचे की, कर्मचाऱ्यांचे हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
The post अर्थसंकल्प: पायाभूत सुविधांच्या विकासावर भर; नूतन योजनांचा समावेश appeared first on पुढारी.