अर्ली द्राक्षाची सलग दुसऱ्या वर्षी माती! उत्पादकांचे चार ते पाच कोटींचे नुकसान 

खामखेडा (नाशिक) : मोठ्या कष्टाने कुटुंबीयांसह काबाडकष्ट करून उभी केलेली द्राक्षबाग सध्या फळांनी लगडल्या असताना हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान व रोजच पडत असलेल्या धुक्याने पुन्हा एकदा हिरावला आहे. सलग दुसऱ्या वर्षी वाजगाव (ता. देवळा) येथील शेतकरी बळिराम देवरे यांच्या द्राक्षबागेचे नुकसान झाल्याने त्यांच्यासोबत इतर अर्ली द्राक्ष उत्पादकांचे चार ते पाच कोटींचे नुकसान झाले आहे. 

अर्ली द्राक्ष पीक घेणाऱ्या उत्पादकांचा गेल्या वर्षीही अशाच प्रकारे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून नेला. यंदा १० डिसेंबरपर्यंत वातावरण चांगले असल्याने हंगाम चांगला येईल, असा अंदाज होता. मात्र ११ डिसेंबरपासून अवकाळी पाऊस व दाट धुक्याचा द्राक्षबागांना फटका बसला असून, यंदाचा हंगामही वाया गेल्याचे विदारक चित्र आहे. पाऊस, दाट धुके व सकाळी पडणाऱ्या दवामुळे येथील देवरे यांच्या चाळीस ते पन्नास टन माल निघणाऱ्या द्राक्षबागेतील द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन झाडावरच द्राक्षघड कुजायला लागले आहेत. 

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

वाजगाव, खर्डा, कनकापूर, भावडे, कापशी, विठेवाडी, भऊर, खामखेडा परिसरातील शेतकरी दर वर्षी अर्ली द्राक्ष घेतात. गेल्या वर्षी या पट्ट्यात काढणीला आलेल्या द्राक्षांचे प्रचंड नुकसान झाले होते. यंदाही लांबलेल्या पावसाने व सुरवातीपासूनच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी प्रचंड कष्टाने निर्यातक्षम द्राक्ष तयार केले होते. चार पाच दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी, दाट धुके व दव असल्याने काढणीला आलेल्या द्राक्षबागेचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये व्यापारी खरेदीसाठी फिरत होते, तर अनेक शेतकऱ्यांचे बाग देऊन झाले असताना शेतकऱ्याच्या हाततोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

एका दिवसात होत्याचे नव्हते

वाजगाव येथील गोविंद देवरे, भूषण देवरे, प्रदीप देवरे, प्रमोद देवरे, अमोल देवरे, राजेंद्र देवरे, साहेबराव देवरे, गोटू देवरे, आबा सावकार, राहुल देवरे, महेश देवरे आदी शेतकऱ्यांचे करोडोचे नुकसान झाले. देवरे यांच्या द्राक्षांचा गेल्या वर्षी ८६ रुपये किलो दराने व्यवहार झाला होता. मात्र एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. यंदा आठवड्यापासून झालेला हवामानातील बदल व अवकाळीमुळे २५ लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे, अशीच परिस्थिती गावातील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. 
 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट