अवकाळीच्या भीतीने शेतकरी धास्तावले! १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान पावसाचा स्कायमेटचा अंदाज 

चांदोरी (जि. नाशिक) : महाराष्ट्रासह देशात १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडेल, असा इशारा स्कायमेटने दिला आहे. हा अंदाज खरा ठरला तर त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार आहे. निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांचीदेखील यामुळे चिंता वाढली आहे. कडाक्याच्या थंडीने अगोदरच मेटाकुटीस आलेला शेतकरी पुन्हा अवकाळी पावसाच्या शक्यतेने धास्तावला आहे. 

पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच विदर्भाच्यावर एक चक्रीवादळी क्षेत्र विकसित होऊ शकते. त्यामुळे तेलंगणमधून दक्षिण तमिळनाडूपर्यंत एक ट्रफ विकसित होऊ शकते. या दोन्ही हवामानाच्या परिस्थितीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून बाष्प भूभागावर येऊन हवामान बिघडून पाऊस पडू शकतो, असे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

दुसरीकडे थंडीत पुन्हा अवकाळी पावसाचे आगमन झाले तर शेतकरी आणि बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा चिंतेत आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत यंदा पावसाचा जोर होता, तर फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी